पुस्तकच साथीदार...

पुस्तकच साथीदार...


पुस्तके माणसाचं जगणं समृद्ध करतात, हे वाक्‍य आपण नेहमी ऐकतो; पण नेमके काय वाचले पाहिजे, हे आपल्या लक्षातच येत नाही. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ‘मी सध्या हे वाचत आहे’ अशी माहिती मागविणारे आवाहन ‘सकाळ’ने केले आणि वाचकांनी पुस्तकांच्या माहितीचा अक्षरशः खजिनाच उलगडला. अनेक प्रसंगात पुस्तके त्यांना प्रामाणिक साथीदारासारखे साथ देत आली. रोजच्या धकाधकीच्या वाटचालीत पुस्तकांसमवेत घालविलेले क्षण या वाचकांनी सर्वांसाठी शेअर केले. त्यापैकी काही निवडक पुस्तकांची माहिती...

धैर्य, जिद्द आणि शौर्याची रोचक कहाणी 

प्रा. अशोक देसाई (पाटण) - लखनौ रेल्वे स्थानकावरून ११ एप्रिल २०११ च्या रात्री ११ वाजता अरूणिमा सिन्हा दिल्लीला मुलाखतीसाठी निघाली. रात्री बारा वाजता तिच्या गळ्यातील सोन्याची चेन चार चोरटे खेचत होते. तिनं त्यांना प्रतिकार केला म्हणून रेल्वेतून बाहेर फेकून दिले. रेल्वेट्रॅकवर पडली, कमरेला दुखापत झाली, उजवा पाय फ्रॅक्‍चर झाला, तेवढ्यात रेल्वे निघून गेली. त्यामुळे डावा पाय गुडघ्यातून तुटून पडला. रात्रभर अशाच अवस्थेत होती. या भयानक प्रसंगाने तिच्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला. दिल्लीत उपचार घेताना एव्हरेस्ट शिखर सर करण्याची इच्छा निर्माण झाली. दुर्दम्य इच्छाशक्ती, अपार कष्ट, कठोर मेहनत, शारीरिक आणि मानसिक बळ, जिद्द यांच्या जोरावर २१ मे २०१३ रोजी अरूणिमा सिन्हाने एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवले. कमरेचं दुखणं, एका पायात रॉड आणि एक पाय गमावून एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला म्हणून अरूणिमा सिन्हा ठरली. भारत सरकारने तिला पद्मश्री देवून गौरविले. सध्या उन्नाव येथे चंद्रशेखर क्रीडा प्रबोधिनी स्थापन करून अपंग युवक, युवतींना आत्मसन्मान मिळवून देण्याचे कार्य करते. तिच्या या कामगिरीची कहाणी "बॉर्न अगेन ऑन दी माउंटेन' या पुस्तकात वाचायला मिळते. या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. अंधारात चाचपडणाऱ्या, नैराश्‍याने घर केलेल्या, नाउमेद व अपयशी ठरलेल्यांसाठी प्रभाकर करंदीकर यांनी "फिरूनी नवी जन्मले मी' हा अनुवाद केला आहे. हे रोमांचकारी, प्रेरणादायी मराठी पुस्तक आवर्जून वाचायलाच हवं. 


वजन कमी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी 

सौ. मनीषा विनोद मगर, सातारा - सध्या मी वाचत आहे, एक अतिशय सुंदर आणि प्रत्येकाला आवश्‍यक असे ऋतुजा दिवेकर यांचे ‘डोन्ट लूज यूवर माइंड, लूज यूवर वेट’ हे पुस्तक. मला वजन कमी करण्यासाठी एका गाइडची गरज वाटत होती आणि तोही पुस्तकाच्या रूपातच पाहिजे होता. कारण त्याला कितीही पिडले, कितीही प्रश्‍न विचारले तरी तो कधीच वैतागून जात नाही. आपल्या वेळेनुसार आपल्यासाठी उपलब्ध असतो. दिवेकर या अभिनेत्री करिनाची आहारतज्ज्ञ. अतिशय सहजसोप्या भाषेत योग्य मार्गदर्शन त्यांनी केले आहे. खरं तर पुस्तकाच्या नावातच खूप काही आहे. ‘डोन्ट लूज यूवर माइंड’ म्हणजे निराश होऊ नका. फक्त वजन कमी करा, तेही योग्य पद्धतीने. खूप ठिकाणी वेगळी उदाहरणे देऊन ते सांगितले आहे. काय खावे आणि महत्त्वाचे ते कसं खावे म्हणजे वेळ आणि पद्धती कशी असावी. अगदी हसत खेळत आपल्याला आपल्या चुकापण दाखविल्या आहेत. स्थानिक पदार्थांचे महत्त्व पटवून दिले आहे. आवडते पदार्थ कसे खावे आणि तरीही वजन कसं कमी करायचं ते अतिशय सुंदर आणि योग्य मार्गदर्शन पुस्तकात आहे. मला फार आवडले हे पुस्तक. वजन कमी करायला अगदी कमी पैशात मिळालेला मार्गदर्शक म्हणजे हे पुस्तक.


देशप्रेमी सेनानीचा प्रेरणादायी प्रवास 

सौ. अर्चना सुहास आमणे (कऱ्हाड) - एक मराठी व्यक्ती ग्रुप कॅप्टन (निवृत्त) दिलीप परुळकर १९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकच्या तावडीत युद्धकैदी म्हणून सापडले. तेथून त्यांनी आपल्या दोन मित्रांसह कशी सुटका करून घेतली, याचे चित्तथरारक वर्णन डॉ. मीना शेटे- संभू यांच्या "वीरभरारी' पुस्तकात आहे. त्यातून त्यांचे धाडस, शौर्य, देशप्रेम, तडफदारपणा, पकडले गेल्यानंतरही न घाबरता निर्णय घेण्याची स्थिर चित्तवृत्ती दिसून येते. हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू एका धाडसी, देशप्रेमी सेनानीचा प्रेरणादायी प्रवास मांडणे आणि तरुणांनी हवाई दलाकडे वळावे हा आहे. पुस्तक वाचायला सुरवात केल्यानंतर ते वाचून झाल्यावरच आपण खाली ठेवतो, इतके ते वाचनीय, स्फूर्तिदायक आहे. 


तालिबानचा उदय अन्‌ होरपळणारी माणसं! 

सौ. स्मिता राजेंद्र साळुंखे (सातारा) - मी सध्या खालिद हुसैनी लिखित "द काइट रनर' या पुस्तकाचे मराठी भाषांतर वाचत आहे. या पुस्तकाला त्यांच्या "थाउजंड स्प्लेंडिड सन्स' या पुस्तकाप्रमाणे अफगाणिस्तानची पार्श्वभूमी आहे. साठीच्या दशकापर्यंत शांत असलेलं अफगाणिस्तान सत्तराव्या दशकात सत्तापालटाने ढवळून निघते. त्यानंतर आलेल्या अफगाणिस्तान फौजा, त्यांना हुसकावून लावण्यासाठी झालेला तालिबानचा उदय, नंतर झालेला अमेरिकेचा हस्तक्षेप आणि या सर्वांत होरपळून निघणारी तेथील माणसं, ज्यांचं त्यांच्या मातृभूमीवर विलक्षण प्रेम आहे! या पुस्तकातील नायक एक लहान मुलगा आहे. जो आपल्या वडिलांच्या मनात स्वत:चं स्थान बनविण्यासाठी धडपडतोय. रशियन फौजांच्या आगमनामुळे झालेल्या धुमश्‍चक्रीत या मुलाच्या कुटुंबाला अमेरिकेत परागंदा व्हावं लागतं ! पुस्तकाच्या मलपृष्ठावरील सारांशावरून कळते की, कित्येक वर्षांनंतरही त्याला मातृभूमीला परतायचंय, त्याच्या हातून घडलेल्या अक्षम्य गुन्ह्याचं प्रायश्‍चित्त घेण्यासाठी! 

मानवी जीवनाचे वास्तव

सौ. रंजना सानप (मायणी) - मी सध्या रॉबिन शर्मा यांचे ‘संन्याशी, ज्याने आपली संपत्ती विकली’ हे पुस्तक वाचत आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे रॉबिन शर्मा यांनी मानवी जीवनाचे वास्तव या पुस्तकातून मांडले आहे. या पुस्तक वाचनाने मी अनेक समस्येवर मात करत आयुष्याची नव्याने सुरवात केली.

सुरेश भट आणि...

प्रकाश देवकुळे (सातारा) - मी सध्या वाचत असलेले पुस्तक आहे ‘सुरेश भट आणि...’ कवी प्रदीप निफाडकर यांनी लिहिलेले हे पुस्तक भटांविषयीच्या स्मरणरंजनाने भरभरून असे आहे. भटभक्तांना माहीत नसलेल्या अनेक घटना, कागदपत्रे, प्रकाशचित्रे आणि त्या प्रवासात आलेल्या अनेक व्यक्ती. त्यांची परस्परांशी असलेली नाती यांचा सविस्तर माहितीपट पुस्तकात रेखाटलाय. भटांचा ‘एल्गार’ ‘झंझावाताच्या’ रूपाने एक वेगळाच रंग आणि नवी ओळख करून देण्यात आली आहे. भटांबद्दलचे वाद, प्रवादांवरही योग्य ते खुलासे केले आहेत. ‘गझल’च्या संदर्भात बरीचशी तांत्रिक माहिती या पुस्तकात मिळते. 

मनाचं गूढ - अर्थात मनात
वासंती जाधव (सातारा) - अदृश्‍य असणारी पण आपल्याला सतत साथ देणारी अशी जर कुठली एकमेव गूढ गोष्ट असेल तर ती म्हणजे आपलं मन. एकविसाव्या शतकातही मन आणि शरीर याचं गूढ नात पूर्णपणे उलगडलेलं नाही. डॉ. अच्युत गोडबोले लिखित ‘मनात’ हे पुस्तक म्हणजे मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफरच म्हणावी लागेल. लेखकाने मनाचं मूळ, त्यातून उद्‌भवलेले आजार आणि मनाचा शोध घेण्याची प्रक्रिया किती पुरातन काळापासून आहे आणि वर्तमानातही त्याचं सुरू असणारं संशोधन हे आणि असे अनेक मनाचे पैलू मांडले आहेत. लेखकाचा अडीच वर्षांचा मुलगा निहार हा ऑटिझम या आजाराने त्रस्त आहे हे समजल्यावर लेखक आणि त्याची पत्नी यांच्यावर झालेला मानसिक आघात आणि त्यातूनच मनाच गूढ उलगडण्याचा एक उत्कृष्ट प्रयत्न म्हणजे ‘मनात’ हे पुस्तक. एखाद्या गोष्टीसारखं लेखकाने हे पुस्तक लिहलं आहे.        

आपण, आपले तणाव

स्वाती भंडारे (कऱ्हाड) - मी सध्या ‘आपण आपले ताणतणाव’ - एक चिंतन, हे अंजनी नरवणे यांचे पुस्तक वाचत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव असतात; पण त्यावर मात करून तणावमुक्त जीवन कसे जगता येईल हे लेखिकेने समर्पक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी काही सहजसोपे उपाय सुचविले आहेत की जे आपण दैनंदिन जीवनात वापरू शकतो. दिवसाकाठी केव्हाही शांत बसावं. निश्‍चितपणे बरं वाटतं. तरतरी येते. पुस्तकात सांगितलेले हे सर्व उपाय मला पटले. तुम्ही हे पुस्तक वाचले तर तुम्हालाही पटतील.     

मी सध्या हे वाचतोय
दिसा माजी काही तरी वाचावे
अ. अ. वैद्य (सातारा) - वाचन संस्कृती वाढली पाहिजे म्हणून तर संत रामदास स्वामी यांनी ‘दिसा माजी काही तरी वाचावे, लिहावे,’ लिहून ठेवले. सरकारने पुस्तके वाचण्यासाठी शहर खेड्यांत ग्रंथालये काढली. मी अनेक ग्रंथ वाचले. मी वाचलेले वि. वि. बोकील यांची कथा. उंदीरमामा तो काय? पण त्याला पकडण्यासाही सहकुटुंब मागे लागतात. हातात काठी घेऊन, तरी तो सापडत नाही. एकाने तो कोपरा, दुसऱ्याने तो कोपरा असे करत. घरात मात्र काठीने मारताना आरसा फुटला, कपाट बाजूला घेताना कपाटाखाली पाय गेला. सगळ्या घरभर ओरडा; पण मामा काही सापडत नाही. या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे वाचताना हसू आल्याशिवाय राहात नाही. त्यांच्या प्रत्येक पुस्तकातील कथा वाचताना मजा येते. कंटाळा येत नाही.

दासबोध
नारायण रामदास मुळे (सातारा) - मी सध्या समर्थ रामदास स्वामींचा दासबोध वाचत आहे. त्यातील विसाव्या दशकातील दहाव्या समासाचे वाचन सुरू आहे. वीस दशक दोनसें समास। साधके पाहावे सावकाश।। विविरता विशेषा विशेष । कळो लागे ।।२०ः१०ः३२।। ही बत्तीसावी ओवी वाचन, श्रवण, मनन व निजध्यास याद्वारे अध्यात्म कसे आत्मसात होईल, याचे मार्गदर्शन करते. या ग्रंथात पहिले ते हरिकथा निरुपण। दुसरे ते राजकारण।। तिसरे ते सावधपण। सर्वाविषयी।। अर्थात व्यवहारज्ञानही. हे ज्ञान ‘नेटका प्रपंच’ करण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे. ‘‘जो जो जयाचा व्यापार। तथे असावे खबरदार।। हे सांगताना जीवनात सचोटीच्या व्यापारीवृत्तीने नफा मिळवावा व स्वतःच्या विकासाबरोबरच ‘लोकांनाही सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करावा, असे बिंबविले आहे. ‘लेकुरे उदंड जाहली। तो ते लक्ष्मी निघोनी गेली।। ही ओवी कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून देते. स्वतः प्रपंच न केलेल्या समर्थांनी ‘प्रपंच व परमार्थ या दोघेमध्ये प्रगती साधणे, हाच खरा पुरुषार्थ, हे सिद्ध करून लोकांना विषद केले आहे. ‘जो उत्तम गुणे शोभला। तोचि पुरुष महाभला।। हे स्वानुभवाद्वारे स्पष्ट करून सांगितले आहे. विवेकाने वागून जीवन सफल केल्यास यशकीर्तीप्रतापी म्हणून समाजात त्यांची नोंद होते. हे दासबोधातून आत्मसात करण्यासारखे आहे.

श्री भक्ती विजय ग्रंथ
नीलम भिसे (सातारा) - मी व माझ्या जाऊबाई सध्या ‘श्री भक्तीविजय ग्रंथ’ वाचत आहे. आमच्या श्री दत्तगुरूंच्या देवळात हा ग्रंथ मिळाला. श्री. महिपाल हे लेखक आहेत. खूप संतांच्या कथा यामध्ये आहेत. श्री ज्ञानेश्‍वर, श्री तुकाराम, श्री कबीर, भानुदास, मुक्ताबाई, जयदेव स्वामी अशा अनेक संतांचा महिमा आहे. ग्रंथ खूप पुरातन आहे. पाने एकदम जीर्ण झाली आहेत; पण वाचनाची गोडी लागली आहे. पूर्वीचे प्राकृत शब्द व अर्थ मी डायरीमध्ये माझ्या शब्दात लिहून काढते. माझ्या मुलालासुद्धा कथा ऐकण्याची गोडी लागली आहे. तो आता या सर्व कथा स्वतः पुन्हा मला सांगतो, हा मोठा फायदा झाला आहे.

छावा
प्रा. जगदीश संपतराव जगताप (वडगाव हवेली, कऱ्हाड) - सध्या शिवाजी सावंतांच्या ‘छावा’ या कादंबरीचे वाचन सुरू आहे. छत्रपती संभाजीराजेंचे जीवन चरित्र या पुस्तकात रेखाटले आहे. पराक्रमी राजा, उत्तम कवी अशी राजांची ख्याती. औरंगजेबाच्या कैदेत असताना लेखकाने केलेले वर्णन अप्रतिम आहे. ते प्रसंग वाचताना नकळत डोळे पाणावतात. मरण यातना सोसत असतानाही स्वाभिमान, स्वराज्याचे हित शंभूराजेंनी त्यागले नाही.

संकटाशी हात करणारा ढाण्या वाघ 
श्रीमती सुतेजा सुभाष दांडेकर (सातारा) - डॉ. गजानन रामचंद्र देशमुख. "एका इनामदाराची संघर्षयात्रा,'हे पुस्तक मी वाचले. सौ. कादंबरी देशमुख यांनी शब्दांकन केलेलं. अंगापूरसारख्या खेडेगावातील माणूस सातारा शहरात शिकून डॉक्‍टर होतो व परत आपल्या जमिनीशी इमान राखून अंगापूरलाच प्रॅक्‍टिस करतो. शेतजमिनीसाठी कोर्ट-कचेऱ्या, घर व कुटुंबीय यांच्यासाठी झीज सोसणे हे सर्व त्यांनी डोक्‍यावर बर्फ व तोंडात खडीसाखर ठेवून केले. हा प्रत्येक संकटाशी चार हात करणारा ढाण्या वाघ आहे. 

‘मनात’
ऍड. अमित द्रविड (सातारा) - सध्या अच्युत गोडबोले यांचं "मनात' पुस्तक वाचत आहे. 

मनकल्लोळ भाग १ आणि २
शिवराज अर्जुन उथळे (शहापूर, ता. कऱ्हाड) - सध्या मी अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी यांचे मानसिक आजारावरील "मनकल्लोळ भाग १ आणि २' पुस्तक वाचत आहे. अतिशय सुंदर, ओघवत्या, सोप्या भाषेत कन्सेप्ट क्‍लिअर केल्या आहेत. आजचे युग ताणतणाव, काळजी, डिप्रेशनचे आहे. त्या दृष्टीने या पुस्तकातून सर्व मनोविकारांची सखोल माहिती आहे. मनोविकारावरील चित्रपट, पुस्तके, प्रसिद्ध व्यक्तीचे मनोविकार या सगळ्या गोष्टी मनोरंजक आहेत. सर्वसामान्य माणसापासून ते मानसोचारतज्ज्ञांपर्यंत सर्वांना हे पुस्तक उपयुक्त आहे. आपल्या आजूबाजूला कोणाला कोणता डिसऑर्डर आहे आणि आपण कोणत्या डिसऑर्डरची शिकार होऊ शकतो, हे पुस्तक वाचल्यानंतर समजते. 

‘द रूम ऑन द रूफ / व्हॅग्रण्टस इन द व्हॅली ’
प्रतीक दोशी (लोणंद, जि. सातारा) - सुप्रसिद्ध अँग्लो इंडियन लेखक रस्किन बॉन्ड यांचं ‘द रूम ऑन द रूफ / व्हॅग्रण्टस इन द व्हॅली’ हे विलक्षण पुस्तक नुकतंच हाती लागलं. १५ ते १६ वर्षांच्या वयातील रस्टीला आलेल्या अनुभवांचं भावपूर्ण चित्रण या कादंबरीत दिसतं. निसर्गसौंदर्याने संपन्न हिमाचल प्रदेशातील डेहराडून परिसरात राहणारा अनाथ रस्टी गार्डियनच्या जाचाला कंटाळून घर सोडतो आणि भेटलेल्या मित्रांच्या सहवासात त्याचा स्वतःला शोधण्याचा प्रवास सुरू होतो. हिमाचलचा निसर्ग, लोकजीवन, रस्टीची मानसिक अवस्था, भेटलेले मित्र हे सगळं वर्णन ओघवत्या शैलीत केलेलं आहे. ‘द रूम ऑन द रूफ’ संपते तिथूनच पुढचा भाग ‘व्हॅग्रण्टस्‌ इन द व्हॅली’ सुरू होतो. या एकाच पुस्तकात दोन कादंबऱ्या वाचायला मिळतात. प्रत्येकानं वाचायला हवं असं हे नितांतसुंदर पुस्तक ‘सकाळ’ प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.

आंतरिक शक्ती वाढविणारे - द सीक्रेट (रहस्य)
संतोष ह. राऊत (लोणंद, जि. सातारा) - मी सध्या ‘द सीक्रेट’ हे लेखिका राँडा बर्न (मराठी अनुवाद डॉ. रमा मराठे) हे पुस्तक वाचत आहे. हे पुस्तक अतिशय चांगले असून, सकारात्मक दृष्टीने प्रयत्न केल्यास जगात काहीच अवघड नाही हे दाखवून दिले आहे. पुस्तकात आपल्यातील लपलेल्या अप्रकट आंतरिक शक्तीची जाणीव होते. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात रहस्य कसे उपयोगात आणावे हे या पुस्तकातून सहज कळते. पुस्तकातील वैशिष्ट्ये म्हणजे, आधुनिक काळातील प्रतिथयश स्त्री- पुरुषांच्या यशस्वितेमागील युक्ती, कल्पना याबाबत विवेचन असून, अनेक मान्यवर लेखक, तत्त्वचिंतक, धर्मोपदेशक, गुरुवर्याच्या शिकवणुकीचा, अनुभवांचा या सगळ्यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. जगातील कोट्यवधी लोकांना सुखी, आनंदी बनवावे हाच उद्देश या पुस्तकात आहे म्हणून सगळ्यांनी ते वाचले पाहिजे. यावर चित्रपटही बनविला आहे.

रश्‍मी बन्सल यांचे ‘कनेक्‍ट द डॉटस्‌’ 
ॲड. विशाल माने (तुळसण) - आजच्या तरुण पिढीला खर तर पंतप्रधान मोदी यांनी उद्योजकतेचे धडे गिरवण्यास शिकवले आहे. त्यातूनच मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्कील डेव्हलपमेंट, मुद्रा योजना आदी योजनांवर भर दिलेला आहे. ‘कनेक्‍ट द डॉटस्‌’ हे रश्‍मी बन्सल यांचे पुस्तक प्रत्येक तरुणाने वाचायला हवे. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता एखादे कौशल्य आत्मसात करून उद्योग उभारावेत. स्वत: नोकऱ्या द्याव्यात. स्वत:चे गुण ओळखून धाडस करायला हव. एखादी वेगळी कल्पना तुम्हाला कोटयधीश बनवू शकते, असे त्यात नमूद आहे.

शिवाजी राऊत यांचे ‘ज्ञान रचनावाद’ 
प्रा. सौ. भारती ज. पवार (सातारा) - शैक्षणिक गुणवत्तेचा विवेकी आग्रह धरणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानरचनावाद. फक्त शाळेच्या वर्गखोल्या, भिंती रंगवल्या, काही आकृत्या वगैरे रेखाटल्या म्हणजे ज्ञानरचनावाद नव्हे, तर बालकांत शिक्षणाची गोडी यावी म्हणून त्याच्या सभोवतालचे वातावरण त्यासाठी पुरक करणे ज्याद्वारे विद्यार्थ्यांना विषयाचे योग्य प्रकारे आकलन होऊन त्या आकलनाचे रूपांतर वर्तनात व्हावे हा ज्ञानरचनावादाचा उद्देश या पुस्तकात सांगितला गेला आहे. एकूनच ज्ञानरचनावाद या संकल्पनेतून मुलांना अधिकाधिक प्रगल्भ कसे बनवायचे, त्यांना मुक्त शिक्षण कसे द्यायचे याचे चांगले ज्ञान या पुस्तकातून मिळाले.

प्रकाशवाटा - अंधारातून उजेडाकडे
श्रेया देसाई (सातारा) - मी सध्या ‘प्रकाशवाटा’ हे डॉ. प्रकाश आमटे लिखित त्यांचे आत्मचरित्र वाचते. या पुस्तकाच्या नावातच सर्व काही दडले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव खूप दूरवर पसरला आहे. १९७३ मध्ये हेमलकसा या अतिदुर्गम आदिवासी परिसरात सुरू केलेले काम... आदिवासींना मुख्य प्रवाहात कसे आणले, त्यांची पिळवणूक कशा प्रकारे थांबवली आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून दिली... असा हा प्रवास. एका हेमलकशाचा प्रवास कसा ‘अंधारातून उजेडाकडे’ गेला हे सगळे अंतर थक्क करणारे आहे.

हॅप्पी थॉटस्‌
रश्‍मी हेडे (सातारा) - सकारात्मक वाचन केल्याने प्रचंड आत्मविश्‍वास निर्माण होतो. आपले आचार, विचारही बदलतात व आंतरिक गुणांना वाव मिळतो. दिवसाची सुरवात जेव्हा एखादा सुंदर सुविचाराने होते तो दिवस आनंदी व उत्साही जातो. मी अनेक वर्ष ‘हॅपी थॉट्‌स’चे पुस्तक वाचते. विविध विषय व त्याची माहिती मनात घर करून जाते. मी सध्या वाचत असलेल्या पुस्तकाचे नाव आहे ‘आत्मनिर्भर कसे व्हाल.’ हे पुस्तक खास महिलांसाठी आहे. या पुस्तकातील माहिती प्रेरणा देणारी आहे. जसे जी स्त्री घराला स्वर्ग बनवू शकते, ती विश्‍वालादेखील स्वर्ग बनवू शकते.

(‘भारताचे संविधान’ वाचत असल्याचे सुरेश जाधव (वाई), ऊर्मिला पवार यांचे ‘आयदान’ वाचत असल्याचे अशोक मोहिते (दहिवडी) व विश्‍वास नांगरे- पाटील यांचे ‘मन में हैं विश्‍वास’ वाचत असल्याचे अनिरुद्ध गायकवाड (गोडोली) यांनी कळवले आहे.)

पुस्तक भिशी..! 

भिशी मंडळ म्हटले, की खानपानाची रेलचेल, मैत्रिणींसोबत निवांतपणा व्यतीत करण्यासाठी राखून ठेवलेली वेळ, नव्या साडीपासून टीव्ही मालिकांच्या कथानकापर्यंत कोणत्याही विषयाचे बंधन नसलेले व्यासपीठ अशी त्याची सर्वसाधारण व्याख्या...; पण नेमक्‍या याच संकल्पनेला छेद देत साताऱ्यातील मैत्रिणींनी ‘पुस्तक भिशी’ मंडळ चालविले आहे. वाचलेल्या पुस्तकांचे रसग्रहण करण्यासाठी जमणाऱ्या या मंडळातील महिला गेल्या तीन वर्षांपासून कृतिशीलपणे सहभाग देत आहेत. 

- शैलेन्द्र पाटील, सातारा.

होय.., होय.. पुस्तक भिशी ! साताऱ्यातील स्वाती राऊत, ॲड. सिमंतीनी नूलकर यांनी या अनोख्या पुस्तक भिशीची संकल्पना काही मैत्रिणींपुढे मांडली. २०१४ मध्ये कोणतीही वर्गणी न काढता या उपक्रमाला सुरवात झाली. या महिला महिन्यातून एकदा जमतात. त्याठिकाणी आधी ठरल्याप्रमाणे एक सदस्या आपण नव्याने वाचलेल्या पुस्तकासंदर्भात सर्वांपुढे विचारांची मांडणी करते. त्यानंतर प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम होते. साधारणपणे तास-दीड तास हा कार्यक्रम चालतो. श्रीमती राऊत, ॲड. नूलकर यांच्यासह भारती महाडिक, आशा देशमुख, डॉ. धनश्री पाटील, गौरी वैद्य, हर्षल राजेशिर्के, चित्रलेखा वाडीकर, विजया जोशी, मनीषा शिर्के, मधू माने, सविता नांगरे, सविता कारंजकर, कल्याणी थत्ते, सविता लेले, सुनेत्रा आगाशे, डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. मेधा क्षीरसागर, डॉ. परिक्षिता भोसले, अनुष्का कर्णे, गार्गी राऊत, डॉ. शुभांगी सहस्त्रबुद्धे, चित्रा भिसे, प्रा. शोभा पाटील, मनुजा अवसरे, अनघा नलवडे, हेमा पवार या महिला त्या भिशी मंडळाच्या सदस्या आहेत.

याविषयी ‘सकाळ’शी बोलताना स्वाती राऊत म्हणाल्या, ‘‘वाचन संस्कृती रुजविणे आणि त्यातून ज्ञानग्रहणाबरोबरच कृतिशील सामाजिक भान वाढविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या भिशीत एका रुपयाचाही व्यवहार होत नाही. सर्वसाधारणपणे एका महिन्यात एक पुस्तक वाचून होते. याबरोबरच आणखी एका पुस्तकाचे रसग्रहण त्रयस्ताच्या नजरेतून करायला मिळते. पुस्तके अनुभव समृद्ध करतात, याचा प्रत्यय आम्ही घेत आहोत.’’

पुस्तक वाचनाबरोबरच मंडळातील सदस्य विविध सामाजिक उपक्रमातही आपल्यापरीने योगदान देतात. अर्थात हा ज्याचा त्याचा ऐच्छिक विषय असतो. विविध विषयांचा परामर्श यानिमित्ताने घेतला जातो. भाषेची समज वृद्धिंगत व्हायला मदत होते. यातून व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असेही त्यांनी सांगितले. या मंडळात काही सदस्या गृहिणी आहेत. कोणी डॉक्‍टर-वकील, शिक्षिका-प्राध्यापिका, बॅंका- एलआयसीतील नोकरदार अशा विविध वाचन व आर्थिक स्तरातील आणि स्वत:च्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असणाऱ्या आहेत. त्यामुळे स्वत:च्या आवडीच्या पुस्तक वाचनाबरोबरच इतर विषयांतील चांगल्या पुस्तकांचे रसग्रहण याठिकाणी होते. ‘पुस्तक भिशी’चा हा अनोखा उपक्रम खरोखरच अनुकरणीय आहे!  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com