अबब..! २३ महिन्यांपासून बोअर अधिग्रहण!

अंकुश चव्हाण
शनिवार, 22 डिसेंबर 2018

कलेढोण - मुळीकवाडी (ता. खटाव) येथे फेब्रुवारी २०१७ पासून अधिग्रहण केलेल्या बोअरवेलने ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरू असून, त्यास २३ महिने पूर्ण झाले आहेत. मुळीकदरा, विखळे तलाव, विहिरी व बोअरवेलमधील पाणीसाठा संपल्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे, तर ओल्या चाऱ्याअभावी पशुधनही धोक्‍यात आले आहे.

कलेढोण - मुळीकवाडी (ता. खटाव) येथे फेब्रुवारी २०१७ पासून अधिग्रहण केलेल्या बोअरवेलने ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरू असून, त्यास २३ महिने पूर्ण झाले आहेत. मुळीकदरा, विखळे तलाव, विहिरी व बोअरवेलमधील पाणीसाठा संपल्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे, तर ओल्या चाऱ्याअभावी पशुधनही धोक्‍यात आले आहे.

गाव परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी डोंगर उतारावर व ठिकठिकाणी जलसंधारणाची कामे झाली. मात्र, पुरेशा पावसाअभावी गावातील पाणीसाठा वाढलाच नाही. गावच्या पूर्वेस मुळीकदरा, तर पश्‍चिमेला विखळे हद्दीतील तलाव कोरडे पडले आहेत. याच तलावाखालील पाणीपुरवठ्याच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या, तर ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर उपाय म्हणून शिवेवरच्या संतोष ओवे यांचे बोअरवेल फेब्रुवारी २०१७ पासून अधिग्रहण केले आहे. तीही शेवटची घटका मोजत असल्याने परिस्थिती ग्रामपंचायत प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आहे. सध्या अधिग्रहणाच्या मदतीने पाच- सहा दिवसांतून पाणीपुरवठा आहे. त्यातही केवळ घरटी पाच- सहा भांडी एवढेच पाणी मिळत आहे, तर दुसरीकडे गावापासून दूर असलेल्या आठ वाड्यावस्त्यांवरही पाणीसमस्या निर्माण झाली आहे. गावकुसापासून या वाड्या-वस्त्यावरील ग्रामस्थ पिण्यासाठी व जनावरांसाठी विकतचे पाणी घेत आहेत. सुमारे ११०० लोकसंख्या असलेल्या मुळीकवाडीत आता टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागणार असल्याने गावप्रशासन प्रस्तावात गुंतले आहे. प्रस्ताव दाखल करताच तालुका प्रशासनाने गावात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी सरपंच शोभा मुळीक व उपसरपंच सुशीला पवार यांनी केली आहे.

जनावरांसह स्थलांतराची वेळ 
गावात जलसंधाराची कामे झाली. मात्र अपुऱ्या पावसामुळे पाणीसाठा झाला नाही. पाणीटंचाईमुळे जनावरांसह स्थलांतराची वेळ आली आहे. त्यासाठी शासनाने शाश्वत पाणीपुरवठा करण्याची गरज आहे, असे मत पाणलोट सचिव मुरलीधर भुसारी यांनी व्यक्त केले.

Web Title: Borewell Water Supply