वाळवा तालुक्‍यात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू...इस्लामपुरात आणखी एक बाधित 

धर्मवीर पाटील 
Friday, 24 July 2020

इस्लामपूर (सांगली)- वाळवा तालुक्‍यातील रोझावाडी आणि काळमवाडी येथील दोन कोरोना बाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्‍यात कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या पाच झाली आहे. काल रात्री काळमवाडी येथे 57 वर्षाचा वयाच्या एकाला कोरोनाची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल केले होते, त्याचा अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान काल रात्री इस्लामपूर येथील दत्त टेकडी परिसरातील 54 वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल "पॉझिटिव्ह' आला आहे. 

काळमवाडी येथे मुंबईहुन आलेल्या एकाला गुरुवारी (ता.23) रात्री उपचारासाठी दाखल केले होते, त्याचा अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आला होता. सदर व्यक्ती मुंबईहून येऊन जवळपास दीड महिना झाला आहे. परंतु घराचे बांधकाम सुरू असल्याने बांधकाम साहित्य आणण्याच्या निमित्ताने सांगली, सातारा, कऱ्हाड या भागात त्यांनी प्रवास केला असल्याने हा संसर्ग झाला असण्याची शक्‍यता तालुका आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्यांना गुरुवारी रात्री उपचारासाठी मिरज येथे दाखल केले होते. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच रोझावाडी गावचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते यांचा काल रात्री कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यांना न्यूमोनिया झाला होता असेही सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 

दरम्यान इस्लामपूरमधील दत्त टेकडी जवळच्या दत्तनगरमध्ये आणखी एकजण "पॉझिटिव्ह' आढळला. त्यांच्या घरी मागच्या आठवड्यात विवाह सोहळा झाला आहे. लग्नासाठी 35 ते 40 लोक सांगलीहुन आले होते. त्याच्या घरात एकूण 6 लोक आहेत. इस्लामपूर येथील समाजकल्याण विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात कोव्हिड सेंटर सुरू केले असून या ठिकाणी 100 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी सांगितले. 

रुग्णांची संख्या 92 वर- 
वाळवा तालुक्‍यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 92 वर पोचली आहे. तर मृतांची संख्या पाच झाली आहे. सध्या 21 जणांवर उपचार सुरू आहेत, तर अन्य रुग्ण बरे होऊन परतले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये फाळकेवाडी, कामेरी, शिगाव, रोझावाडी तसेच केदारवाडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 

संपादन : घनशाम नवाथे  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both died due to corona in Valva taluka . Another affected in Islampur