सोलापूरच्या नगरसेवकांना हवे आहे बाऊंसर्सचे संरक्षण

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

गेल्या वर्षभरात विकासकामासाठी निधी मिळाला नाही. प्रभागात कामे झाली नाहीत. त्यामुळे नागरीक कधीही अंगावर धाऊन येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर पालिकेतील कार्यालयासमोर बसून राहणाऱ्या बाऊंसर्सची नियुक्ती माझ्या सुरक्षेसाठी करावी, असे पत्र आयुक्तांना दिले आहे.
- नागेश वल्याळ, नगरसेवक, भाजप

सोलापूर : महापालिकेतील नगरसेवकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी बाऊंसर्सची नियुक्ती करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, बाऊंसर नियुक्तीवरून सामान्यांकडून नाराजी व्यक्त होऊ लागल्याने, महापौर कार्यालयासाठी नियुक्त बाऊंसर्स काढून टाकण्याचे पत्र महिला महापौरांनी दिल्यामुळे प्रशासनाचे हसे झाले आहे. 

सुरक्षेच्या कारण सांगत या बाऊंसर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून नगरसेवकांतून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकाराबद्दल सोशल मिडीयावर सोलापूरकरांनी खिल्ली उडविण्यास सुरवात केली आहे. बाऊंसर नियुक्त करायला महापालिका म्हणजे पब किंवा डांसबार नाही, अशा तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

सुरक्षेच्या नावाखाली महापालिकेत वाहने सोडण्यासही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नेहमी वाहने आणि नागरिकांनी गजबजलेल्या महापालिकेस वाळवंटाचे
स्वरुप आले आहे. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा झाला आहे तो मोकाट कुत्र्यांना. विस्तीर्ण परिसर मोकळे असल्याने या कुत्र्यांचा मुक्त संचार सुरु झाला आहे.
पालिकेत फक्त पदाधिकारी आणि अधिकार्यांच्या मोटारींना प्रवेश आहे. त्यामुळे ज्यावेळी एखादे चारचाकी वाहन पालिकेच्या आवारात येते, तेंव्हा हे मोकाट कुत्रे त्या
मोटारीच्या मागे धावत आहे. पुढे मोटार मागे, तिच्या आजुबाजूला कुत्रे असे चित्र दिसत आहे. त्यामुळे पालिकेच्या उद्यानात बसलेल्यांचे मनोरंजनही होत आहे.

महापालिकेच्या विकासकामासाठी निधी मिळालेला नाही. गेल्या वर्षीचा निधीही रद्द करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या नगरसेवकांनी 
बाऊंसर नियुक्तीवरून प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे. कर्मचार्यांचा पगार किंवा थकीत रक्कम द्यायचा प्रश्न आला की गंगाजळी नसल्याचे सांगत प्रशासन हात झटकते. त्याचवेळी खासगी सुरक्षा रक्षक आणि बाऊंसर्सवर खर्च करण्यासाठी त्यांना लाखो रुपये कसे उपलब्ध होतात, असा प्रश्न नगरसेवकांतून विचारला जात आहे. 

गेल्या वर्षभरात विकासकामासाठी निधी मिळाला नाही. प्रभागात कामे झाली नाहीत. त्यामुळे नागरीक कधीही अंगावर धाऊन येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर पालिकेतील कार्यालयासमोर बसून राहणाऱ्या बाऊंसर्सची नियुक्ती माझ्या सुरक्षेसाठी करावी, असे पत्र आयुक्तांना दिले आहे.
- नागेश वल्याळ, नगरसेवक, भाजप

महापालिकेत बाऊंसर्सची नियुक्ती करायला सोलापुरात इतकी दहशत आहे का. काहीच सुविधा न दिल्याने नगरसेवकांना प्रभागातून फिरणे मुश्किल झाले आहे. जसे अधिकाऱ्यांना स्वतःच्या जीवाची काळजी आहे, तशी त्यांनी नगरसेवकांच्या जीवाचीही करावी आणि प्रत्येक  नगरसेवकांच्या सुरक्षेसाठी बाऊंसर्सची नियुक्ती करावी. कारण महापालिका आवारात नागरिकांपेक्षा मोकाट कुत्र्यांपासूनचा धोका जास्त झाला आहे. 
- रियाज खरादी, नगरसेवक, एमआयएम

Web Title: bouncers security in Solapur Municipal corporation