सोलापूर : रेल्वे स्टेशनवर पिचकारी मारणाऱ्यांवर बाऊंसरचा वॉच! 

rela.jpg
rela.jpg

सोलापूर : नेहमीप्रमाणे प्रवाशांची गर्दी.., महिला.. लहान मुले आणि ज्येष्ठांचीही धावपळ.., कोठे घाण तर झाली नाही ना म्हणून फिरणारे सफाई कर्मचारी.., तिकीटांची तपासणी करणारे तिकीट निरीक्षक..., रेल्वे डब्यातून उतरल्या उतरल्या थुंकण्यासाठी, तोंडातील गुटख्याची पिचकारी मारण्यासाठी जागा शोधणारे प्रवासी.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे थुंकणाऱ्या, कचरा करणाऱ्या प्रवाशांवर वॉच ठेवून असलेला बाऊंसर! हे चित्र आहे सोलापूर रेल्वे स्थानकावरील.

दरम्यान, स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आलेल्या सोलापूर रेल्वे स्थानकावर कचरा करणाऱ्या आणि थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी स्वतंत्रपणे एक बाऊंसर आणि तिकीट निरीक्षक नियुक्त केला आहे. प्रवासी.. मग तो स्थानिक असो किंवा मग परगावाहून सोलापुरातल्या नातेवाईकांकडे आलेला असो.. रेल्वे डब्यातून बाहेर पडताच अनेकांना आधी थुंकण्याची सवय असल्याचे रेल्वे स्थानकावर थांबल्यावर दिसून येते. महाराष्ट्रात स्वच्छतेबाबतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर रेल्वे स्थानकावरील स्वच्छता टीकवून ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी सदैव तत्पर असल्याचे दिसून येत आहे.

अशातच गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानक आणि परिसरात थुंकणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. थुंकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान किंवा मग खासगी कंपनीकडून नियुक्त केलेला बाऊंसर नियुक्त केले आहेत. गेल्या एका महिन्यात पाचशे प्रवाशांवर कारवाई करून एक लाख अकरा हजार दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दररोज सरासरी रोज पंधरा ते वीस प्रवाशांवर अशाप्रकारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. याबाबत जनजागृती व्हावी म्हणून जागोजागी फलकही लावले आहेत. 

रेल्वे कर्मचाऱ्यालाही दंड-
अनेक प्रवासी रेल्वेस्थानकावर जेवण करतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी कचरा टाकून निघून जातात. अशांनाही 500 रुपये दंड केले जात आहे. डब्यात थुंकणे, सिगारेट ओढणे, घाण करणे यासाठीही भारतीय रेल्वे कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे. सहा महिन्यापूर्वी तंबाखू चोळून रेल्वेस्थानकावर तंबाखूचा कचरा टाकताना रेल्वेच्या कर्मचाऱ्याला एका न्यायाधीशांनी पाहिले. त्या रेल्वे कर्मचाऱ्यालाही दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. 

थुंकण्यासाठी जागाच नाही- 
कचरा टाकण्यासाठी जागोजागी डस्टबिन असले तरी थुंकण्यासाठी मात्र कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. त्यामुळे अनेक प्रवासी कचऱ्याच्या डब्यात किंवा पाणी पिण्याच्या ठिकाणी, जिन्याच्या बाजुला आणि जागा मिळेल तेथे थुंकून घाण करत आहेत. थुंकवण्यासाठी डबे किंवा मग वेगळी जागा करण्याची आवश्‍यकता असल्याचे रेल्वे प्रवाशांचे म्हणणे आहे. 

दंडाची रक्कम कमी-जास्त-
रेल्वे स्थानक परिसरात घाण करणाऱ्या, थुंकणाऱ्यांना ताब्यात घेऊन रेल्वे न्यायालयात हजर करावे असे कायद्यात सांगितले आहे, पण ही प्रक्रिया खूपच किचकट आहे. रेल्वे प्रशासनाने तिकीट निरीक्षकांच्या माध्यमातून अशा प्रवाशांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. काही ठिकाणी पाचशे दंडाचे तर काही ठिकाणी शंभर रुपये दंडाचे फलक आहेत. ही रक्कम एकच असायला हवी. कधी पाचशे रुपये तर कधी अडीचशे रुपये दंड घेऊन पावती केली जात आहे. 

रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केले जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता ठेवणे ही प्रत्येक प्रवाशाची जबाबदारी आहे. थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्रपणे एक बाउंसर आणि एक निरीक्षक नियुक्त केला आहे. एकदा एखाद्या प्रवाशाला दंड झाला की ते दुसऱ्याला सांगतो आणि या माध्यमातून हे प्रमाण हळूहळू थुंकण्याचे प्रमाण कमी होईल अशी प्रशासनाला आशा आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला स्वच्छता ठेवण्यासाठी सहकार्य करावे. दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतल्यानंतर काही प्रवासी वाद घालतात तर काहीजण आपली चूक मान्य करून लगेच दंड भरून निघून जातात. दंड केल्यानंतर लगेच पावती दिली जाते. - रफिक इनामदार, मुख्य तिकीट निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com