बोभाटा अतिवृष्टीचा... सामना दुष्काळाचा

दत्ता इंगळे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

परतीच्या पावसाने नगर जिल्ह्यातील काही ठिकाणी पिके सडली, तर काही ठिकाणी टिपूसही नाही. परिणामी विहिरींची पाणीपातळी वाढलेली नाही. रब्बीतील पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. नगर तालुक्‍यातील बहुतांशी पाझर तलावांचा तळही झाकला नाही.

नगर ः परतीच्या पावसाने नगर जिल्ह्यातील काही ठिकाणी पिके सडली, तर काही ठिकाणी टिपूसही नाही. परिणामी विहिरींची पाणीपातळी वाढलेली नाही. रब्बीतील पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. नगर तालुक्‍यातील बहुतांशी पाझर तलावांचा तळही झाकला नाही. यामुळे येत्या काही दिवसांत तालुक्‍यात पाण्याचे टॅंकर सुरू करावे लागतील, अशी स्थिती आहे. अतिवृष्टी हा केवळ बोभाटा असल्याची तालुक्‍यातील शेतकऱ्यांची भावना आहे. 

राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. नगर जिल्ह्यातही काही ठिकाणी हीच स्थिती उद्‌भवली. नगर तालुक्‍यात मात्र नेमके उलटे चित्र आहे. खरिपात मूग, बाजरी सोयाबीन, कांदा, मका यांसारखी पिके कशीबशी तग धरून होती. परतीच्या पावसात या पिकांची अक्षरशः वाट लागली. तालुक्‍यात झालेला पाऊस विस्तृत नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक तग धरून उभे आहे. गहू, हरभरा पिकाची अजूनही पेरणीच झालेली नाही. 

टॅंकरसाठी प्रस्ताव 

महिनाभरात या पिकांना पाण्याची गरज भासणार आहे. सध्या कूपनलिका व विहिरींना थोडेफार पाणी वाढले आहे. ते पाणी फार तर महिनाभर टिकू शकते. पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागल्याने पंचायत समितीच्या कार्यालयात टॅंकरचे प्रस्ताव दाखल होऊ लागले आहेत. शहरालगत असलेल्या नालेगाव, सावेडी, भिंगार या तीन मंडलांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. जेऊर आणि चिचोंडी पाटील मंडळात स्थिती बरी आहे. तरीही ऐतिहासिक पिंपळगाव माळवी तलावात, चिचोंडी शिवारातील केळ तलाव, कापूरवाडी तलाव, कामरगाव-बहिरवाडी तलावात केवळ नावालाच पाणी आहे. वाळकी येथील धोंडवाडी व देऊळगाव सिद्धीजवळील पाझर तलाव मात्र आजही कोरडेठाक आहेत. 

पावसाची मंडलनिहाय आकडेवारी 

नालेगाव - 777 मिलिमीटर, सावेडी - 555 मिलिमीटर, जेऊर - 570 मिलिमीटर, रुईछत्तिशी - 499 मिलिमीटर, कापूरवाडी - 316 मिलिमीटर, केडगाव - 431 मिलिमीटर, चास - 402 मिलिमीटर, भिंगार - 806 मिलिमीटर, नागापूर - 391 मिलिमीटर, वाळकी - 304 मिलिमीटर, चिचोंडी पाटील - 616 मिलिमीटर 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bovata Rainfall ... Drought Fating Drought