अल्पवयीन मुलगा पळवतोय बॅग 

सूर्यकांत वरकड
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील एनआर लॉन्स मंगल कार्यालयातून वऱ्हाडी मंडळींची नजर चुकवून एका अल्पवयीन मुलाने पाच लाख 98 हजार रुपये किमतीचे 25 तोळे सोने असलेली बॅग लांबविली. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

नगर : नगर-औरंगाबाद रस्त्यावरील एनआर लॉन्स मंगल कार्यालयातून वऱ्हाडी मंडळींची नजर चुकवून एका अल्पवयीन मुलाने पाच लाख 98 हजार रुपये किमतीचे 25 तोळे सोने असलेली बॅग लांबविली. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

याबाबत अजिंक्‍य दिलीप नागरे (रा. श्रीरामपूर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नगर-औरंगाबाद रस्त्यावर एनआर लॉन्स येथे काल सायंकाळी विवाह सोहळा होता.

त्या विवाह सोहळ्यासाठी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने आणण्यात आले होते. ते दागिने एका बॅगमध्ये ठेवलेले होते. वऱ्हाडी मंडळींची घाई-गडबड सुरू असताना एका लहान मुलाने ती बॅग उचलली आणि तो पळून गेला. काही वेळानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मात्र, तोपर्यंत तो मुलगा बॅग घेऊन पसार झाला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मोहन बोरसे तपास करीत आहेत. 

दरम्यान, नगर-औरंगाबाद रस्त्यावरील साई लॉन्स व नवनागापूर येथील सिद्धी लॉन्समधून वऱ्हाडी मंडळींचे  सुमारे पावणेचार लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना बुधवारी (ता. 20) घडली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातही बॅग चोरण्यासाठी लहान मुलाचा वापर करण्यात आला आहे. तो लहान मुलगा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. 

वऱ्हाडी धास्तावले 
तुळशीचे लग्न झाल्यानंतर विवाह सोहळ्यास सुरवात होते. त्यानुसार नगर शहर आणि परिसरातील सर्वच मंगल कार्यालयांत दररोज विवाह सोहळे पार पडत आहेत. मात्र, गेल्या चार दिवसांत तीन मंगल कार्यालयांतून सोने चोरीला जाण्याच्या घटना घडल्याने वऱ्हाडी धास्तावले आहेत. 

मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या 
पोलिसांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शहर व परिसरातील सर्वच मंगल कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, तरीही चोरी होत असल्याने पोलिस चक्रावून गेले आहेत. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींनी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मध्य प्रदेशातील आरोपी 
गतवर्षी नगर-औरंगाबाद रस्त्यावरील एका लॉन्समधील विवाह सोहळ्यात मुलीच्या वडिलांची लाखो रुपयांची रोकड लांबविली होती. त्यातही अल्पवयीन मुलगा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने गुन्ह्याचा शोध घेत मध्य प्रदेशातून आरोपींची टोळी आणली होती. 

पिस्तूलही मुलानेच पळविले 
शहरातील टिळक रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यासाठी आलेल्या साध्या वेशातील पोलिस निरीक्षकाने शासकीय पिस्तूल पत्नीच्या पर्समध्ये ठेवले होते. चोराने नेमकी तीच पर्स पळवून नेली. त्यामुळे पोलिसांनी धावाधाव करून पिस्तूल परत आणले. मात्र, आरोपी आणता आले नाहीत. त्यातही पर्स चोरणारा मुलगा अल्पवयीनच होता. दोन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. 

लवकरच उकल होईल 
दोन्ही गुन्ह्यांच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलिसांकडून गुन्ह्याचा शोध सुरू असून, लवकरच त्याची उकल होईल. 
- अजित पाटील, पोलिस उपअधीक्षक 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The boy stole jewelry