धामणी खोऱ्यातील ६० गावांचा आगामी निवडणुकांवर बहिष्कार

धामणी खोऱ्यातील ६० गावांचा आगामी निवडणुकांवर बहिष्कार

म्हासुर्ली -  ‘पाणी, पाणी म्हणत अनेक डुया संपल्या; मात्र पाणीच नाही. पाण्याअभावी रखरखलेले जीवन, खुरटलेले संसार घेऊन जगणाऱ्या धामणीवासीयांच्या भावनांचा बांध अखेर फुटला. पाण्याच्या प्रतीक्षेत अर्धेअधिक आयुष्य सरले. निदान पोराबाळांच्या जीवनाचा तरी उद्धार होईल का? मायबाप सरकार, मग हे सरकारच निष्ठुर का झालं असावं?’, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत धामणी खोरे विकास कृती समितीतर्फे सरकारविरोधात आक्रोश केला. 

संतप्त ६० गावांतील जनतेने धामणी धरणाचे काम चालू होत नाही, तोपर्यंत सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे. तसा निर्धार आजच्या जनआक्रोश मेळाव्यात करण्यात आला.
तब्बल १८ वर्षे धामणी प्रकल्प रखडल्याच्या निषेधार्थ धुंदवडे (ता. गगनबावडा) येथे धामणीवासीयांचा येथे जनआक्रोश मेळावा आज झाला. 

दरम्यान, २००० ला ३.८५ टीएमसी धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. दोन-तीन वर्ष चाललेले काम वगळता आजवर हा प्रकल्प रखडलेल्या अवस्थेत आहे. दोन वर्षांपूर्वी प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही शासनाच्या उदासीनतेने निविदा निघाली नसल्याने प्रकल्प कामास प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकलेली नाही. याचा मेळाव्यात निषेध करण्यात आला.

दरवर्षीच उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते; पण सध्या धामणी खोऱ्यात भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. अनेकदा आंदोलने करूनही येथील लोकांच्या न्याय मागणीला शासनाकडून केराची टोपलीच दाखवली. मेळाव्याला ६० गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

आंदोलनाची व्याप्ती वाढविणार
धामणी खोरे विकास कृती समितीच्या माध्यमातून धुंदवडे येथे जनआक्रोश मेळावा झाला. या मेळाव्यात हजारोंच्या समुदायाने प्रचंड घोषणाबाजी केली. येथील गावागावांतील निवडणुकांवर बहिष्काराचे ठराव कृती समिती व्यवस्थापनाकडे सुपूर्द केले. हा आंदोलनाचा पहिला टप्पा असून, पुढील काही दिवसांत आंदोलनाची व्याप्ती वाढवून कोणत्याही प्रकारचा शासकीय कर न भरणे, शासकीय अधिकाऱ्यांना परिसरात प्रवेश नाकारणे आदी बाबींद्वारे शासनाचे डोळे उघडण्याचे नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com