दिवाळीसाठी माहेरी आलेल्या प्रियंकाचा एकतर्फी प्रेमातून खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

दिवाळीसाठी माहेरी आलेल्या प्रियंका तुकाराम गोडगे (रा. साकत, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) हिचा खून एकतर्फी प्रेमातून झाल्याची फिर्याद तिचे वडील गोविंद चवरे (रा. सोलापूर) यांनी पोलिसांत दिली आहे

सोलापूर : दिवाळीसाठी माहेरी आलेल्या प्रियंका तुकाराम गोडगे (रा. साकत, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) हिचा खून एकतर्फी प्रेमातून झाल्याची फिर्याद तिचे वडील गोविंद चवरे (रा. सोलापूर) यांनी पोलिसांत दिली आहे. या प्रकरणातील संशयित राजू शंके हा फरार आहे. ही घटना काल शुक्रवारी उघडकीस आली होती.

साकत येथील तुकाराम गोडगे यांच्याशी तिचा 2015 मध्ये विवाह झाला होता. लग्नापूर्वी याच परिसरातील राजू शंके हा तिची छेड काढायचा. या प्रकरणी प्रियंकाच्या आई-वडिलांनी राजूच्या आई-वडिलांकडे तक्रारही केली होती. महिन्यापूर्वी प्रियंका सोलापुर येथे आली होती, त्यावेळीही राजूने तिला बोलण्याचा प्रयत्न केला होता. 

प्रियंका दिवाळीच्या सुटीत माहेरी आली होती. मुलगी श्रेयाला सर्दी खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने ती उपचारासाठी
परिसरातील खासगी रुग्णालयात घेऊन गेली. दरम्यान रात्री साडेनऊच्या सुमारास शाम निकम हा श्रेयाला घेऊन तिच्या आई-वडिलांकडे गेला. राजू शंके याने मला बोलावून घेतले होते व त्याने श्रेयाला माझ्याकडे दिले व तो पोलिस चौकीत जातो असे सांगून निघून गेला, अशी माहिती निकम याने प्रियंकाच्या आई-वडिलांना दिली.

हे एेकल्यावर प्रियंकाचे नातेवाईक घटनास्थळी आले. ती रेल्वेमार्गाच्या परिसरात पडली होती. कुटुंबियांनी तातडीने तीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे डॅाक्टरांनी सांगितले. एकतर्फी प्रेमातून राजू शंके याने प्रियंकाचा खून केल्याची फिर्याद प्रियंकाचे वडील गोविंद चवरे यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार प्रियंकाचा खून गळा दाबून केल्याचे माहिती पोलिसांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boyfriend killed girlfriend in Solapur