मृत मेंदूनंतर अवयव दानासाठी हवा पुढाकार 

संतोष भिसे
बुधवार, 13 जून 2018

मिरज - सांगली-मिरजेतील विविध दवाखान्यांत मरण पावणाऱ्या अनेक रुग्णांपैकी दररोज किमान दोघेजण ब्रेन डेडचे बळी ठरतात. डॉक्‍टरांनी तसे जाहीर करताच अंत्यसंस्काराची तयारी सुरू होते आणि अत्यंत मौल्यवान मानवी अवयव आगीत नष्ट होतात. त्याचवेळी मानवी अवयव दान न मिळाल्याने याच शहरासह अनेक रुग्ण त्या प्रतीक्षेत मरणाला जवळ करीत असतात. वैद्यकीय पंढरी मिरजेतील अनेक तज्ज्ञ दररोजच अशा अत्यंत वेदनादायी अनुवभवांचे साक्षीदार ठरतात. 

मिरज - सांगली-मिरजेतील विविध दवाखान्यांत मरण पावणाऱ्या अनेक रुग्णांपैकी दररोज किमान दोघेजण ब्रेन डेडचे बळी ठरतात. डॉक्‍टरांनी तसे जाहीर करताच अंत्यसंस्काराची तयारी सुरू होते आणि अत्यंत मौल्यवान मानवी अवयव आगीत नष्ट होतात. त्याचवेळी मानवी अवयव दान न मिळाल्याने याच शहरासह अनेक रुग्ण त्या प्रतीक्षेत मरणाला जवळ करीत असतात. वैद्यकीय पंढरी मिरजेतील अनेक तज्ज्ञ दररोजच अशा अत्यंत वेदनादायी अनुवभवांचे साक्षीदार ठरतात. 

समाजाची संवेदनशीलता आणि श्रद्धेला आव्हान देणारे असे अनेक प्रसंग सांगली-मिरजेत दररोजच कोणत्या ना कोणत्या दवाखान्यात अनुभवायला येतात. दवाखान्यांचे शहर असणाऱ्या मिरजेत दररोज सरासरी पाचशेहून अधिक रुग्ण दाखल होतात. किमान पन्नासभर अत्यवस्थ अवस्थेतील असतात. अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान काहीजण मरण पावतात. त्यातले दररोज किमान दोन रुग्ण मेंदू मृतावस्थेत गेल्याने जगाचा निरोप घेतात. असे जाणकारांचे मत आहे. मेंदू मृत झाला तरी त्यांचे अन्य सर्व अवयव काही काळापर्यंत जिवंत आणि कार्यक्षम असतात. ज्याचा उपयोग आधुनिक वैद्यकीय ज्ञानाने इतरांना उपयोग होऊ शकतो. या अवयवांचे दान स्वीकारून त्याचे प्रत्यारोपणाच्या अनेक घटना देशभरात दररोज होत असतात. 

आपल्याकडे मात्र याबाबत पुरेशी जनजागृती नाही. त्याचवेळी गरजूंपर्यंत अवयव पोहोचवणारी यंत्रणा नाही. गेल्या पंधरा-वीस वर्षांत नेत्रदान, देहदानाची संकल्पनाही रुजल्या आहेत. असाच प्रतिसाद अवयव दानाबाबत मिळू शकतो. त्यासाठी सांगली-मिरजेत वैद्यकीय क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत हे महत्त्वाचे कारण आहे. मिरज सिव्हिलमध्ये अवयवदानासंदर्भात सुमारे वर्षभरापूर्वी प्राथमिक पाहणी झाली होती. अंतिम निर्णयाची झालेला नाही. इथे ही सुविधा झाल्यास त्याचा लाभ सांगली, कोल्हापूर, बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील परिसराला फायदा होऊ शकतो. 

'मेंदू मृत झाल्याने मृत्यू' असे जाहीर करण्यासाठी शासनाचे अनेक निकष आहेत; पण झंझट नको म्हणून बऱ्याचदा मृत्यूचे वेगळेच कारण नमूद केले जाते. त्यामुळेही ब्रेन डेडच्या नोंदी कमी होतात. मेंदू मृत झाल्यानंतर कोणताही अवयव पूर्वस्थितीत येत नाही; त्या रुग्णासाठी ते निरुपयोगी असतात. त्यांचे दान करून अनेकांना नवे जीवन बहाल करता येते. शासनाने यासाठी टास्क फोर्स नेमून धोरण ठरवले पाहिजे. डॉक्‍टरांचेही प्रबोधन हवे. मूत्रपिंडदानाबाबत समाजातील गैरसमज आहेत. त्यांची विक्री केली जाते यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. आपण मानसिकता बदलली पाहिजे.'' 
- डॉ. नथानिएल ससे, संचालक वॉन्लेस हॉस्पिटल 

- हृदय, मूत्रपिंड, यकृत, पित्ताशय, मज्जारज्जू, पित्ताशय, फुप्फुसे, त्वचा, डोळ्यांतील बुबूळ, काही पेशी अवयव दान होऊ शकते 
- मूत्रपिंड व बुबूळ दानाबाबत समाजात चांगली सजगता आली आहे. 
- मिरजेतील पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण मिशनमध्ये झाले होते.

Web Title: brain dead body organ donate Initiative