ब्रेनडेड रवींद्रमुळे चौघांना जीवदान, दोघांना मिळणार दृष्टी 

Brain dead Ravindra gives life to four others by organ donation
Brain dead Ravindra gives life to four others by organ donation

सोलापूर : अपघातानंतर ब्रेनडेड झालेल्या रवींद्र श्रीरंग शिंगाडे (वय 31, रा. हिवरे ता. मोहोळ) यांच्या अवयवदानाची प्रक्रिया आज सोमवारी दुपारी पार पडली. ग्रीन कॉरीडोअर करून रवींद्रचे हृदय हेलिकॉप्टरमधून तर किडनी, स्वादुपिंड, यकृत हे अवयव रुग्णवाहिकेतून पुण्यातील रुग्णालयांमध्ये पोचवण्यात आले. ब्रेनडेड रवींद्रमुळे चौघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळणार आहे. 

रवींद्र शिंगाडे यांचा 20 जुलै ला सोलापूर-पुणे महामार्गावर हिवरे गावाच्या फाट्यावर ट्रकने समोरून धडक दिल्याने अपघात झाला होता. डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्यानंतर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनातून रवींद्रला मोहोळपर्यंत पोहोचवले. मोहोळपासून रुग्णवाहिकेतून सोलापुरातील सीएनएस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथील उपचारानंतर रवींद्रला यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना रवींद्रचा मेंदूमृत झाल्याची कल्पना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाइकांना दिली. आवश्‍यक त्या चाचण्या केल्यानंतर रविवारी रवींद्रचा मेंदूमृत असल्याचे निश्‍चित झाले. वैद्यकीय अधिकारी, अवयव प्रत्यारोपण समन्वयकांनी रवींद्र नातेवाइकांना अवयवदानाविषयी समुपदेशन केले. दु:खात असलेल्या रवींद्रच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्यासाठी संमती दर्शविली. 

सर्व कायदेशीर प्रक्रियेसाठी यशोधरा रुग्णालयाच्या प्रशासनाने पुण्यातील झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटीच्या समन्वयकांशी संपर्क केला. त्यांच्या सूचनेनुसार सोमवारी दुपारी अवयवदानाची प्रक्रिया पार पडली. अवयवदानाची प्रक्रिया पार पडण्यासाठी रवींद्रची पत्नी वनिता, आई रंजना, वडील श्रीरंग, भाऊ सागर, मेव्हणे अर्जुन यांनी बहुमाल योगदान दिल्याची माहिती डॉ. विजय शिवपूजे यांनी दिली. 

अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी यशोधरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. बसवराज कोलूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विजय शिवपुजे, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. आशिष भुतडा, डॉ. सचिन बलदवा, डॉ. मुक्तेश्‍वर शेटे, डॉ. राहुल स्वामी, डॉ. संजय गायकवाड, डॉ. निलरोहीत पैके, डॉ. शेहरोज बॉम्बेवाला, प्रशासकीय अधिकारी विजय चंद्रा, शरण मालखेडकर, परेश मनलोर, धनंजय मुळे, डॉ. संदीप लांडगे, संपत हलकट्टी, अवयव प्रत्यारोपण समन्वयक सुक्रांत बेळे यांनी परिश्रम घेतले. 

हे अवयव केले दान.. 
यशोधरा रुग्णालयापासून होटगी रस्त्यावरील विमानतळापर्यंत ग्रीन कॉरीडोअर करण्यात आला होता. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करून दिला. दुपारी दोन वाजता रुग्णालयातून हृदय घेऊन निघालेली रुग्णवाहिका अवघ्या काही मिनिटात विमानतळावर पोचली. रवींद्रचे हृदय हेलिकॉप्टरमधून पुण्यातील रूबी हॉस्पिटल येथे नेण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून एक किडनी व स्वादुपिंड हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, यकृत आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये, दोन्ही डोळे सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सोलापूर ते पुणे रस्त्यावरही ग्रीन कॉरीडोअर करण्यात आला. रवींद्रची एक किडनी यशोधरा हॉस्पिटलमधील रुग्णास देण्यात आली. 

रवींद्र शिंगाडे यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानास संमती दिल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. शिंगाडे यांच्या एका नातेवाइकांचे यापूर्वी अवयवदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे ते या प्रक्रियेस लगेच तयार झाले. हृदय विमानाने पुण्याला पाठविले तर इतर अवयव रुग्णवाहिकेतून पुण्याला नेण्यात आले. 
- डॉ. विजय शिवपुजे, यशोधरा हॉस्पिटल 

अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने माझा भाऊ रवींद्र ब्रेनडेड झाला. डॉक्‍टरांनी अवयवदानाची प्रक्रिया समजावून सांगितली. मृत्यूनंतरही तो अवयवाच्या माध्यमातून दुसऱ्याच्या शरीरात जिवंत राहणार असल्याने आम्ही त्याचे अवयवदान केले. 
- सागर शिंगाडे, मृत रवींद्रचे भाऊ

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com