esakal | "ब्रेक द चेन' देणार रोजगाराच्या चक्रालाच ब्रेक!

बोलून बातमी शोधा

"Break the chain" will break the cycle of employment!

थोडी गाडी रुळावर येईल अशी आशा तयार होत होती. त्या आधी पुन्हा एकदा चालत्या गाडीला ब्रेक लागतोय... पुन्हा एकदा टाळेबंदीचे काळे ढग ऐन उन्हाळ्यात घोंगावत आहेत. या कठोर निर्बंधाचा फटका ज्या क्षेत्रांना प्रामुख्याने बसणार आहे, त्या क्षेत्रांतील मान्यवर सांगत आहेत प्रातिनिधिक भावना.... 

"ब्रेक द चेन' देणार रोजगाराच्या चक्रालाच ब्रेक!
sakal_logo
By
जयसिंग कुंभार

थोडी गाडी रुळावर येईल अशी आशा तयार होत होती. त्या आधी पुन्हा एकदा चालत्या गाडीला ब्रेक लागतोय... पुन्हा एकदा टाळेबंदीचे काळे ढग ऐन उन्हाळ्यात घोंगावत आहेत. वर्षापूर्वी अशीच टाळेबंदी लागू झाली, त्यावेळच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत बराच मोठा फरक आहे. तेव्हाच्या चुकांमधून बरेच शहाणपण यावं अशी अपेक्षा. अर्थचक्र सुरू ठेवतानाच गर्दी टाळायची असा एकूण सध्याच्या निर्बंधाचा हेतू आहे. "ब्रेक द चेन'... असं या अंशतः टाळेबंदीचं नामकरण करण्यात आलंय. गर्दी टाळून व्यवहार करा, त्यासाठी गरजेचं सारं काही सुरू, रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी असेल. गर्दी होईल अशा सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांना आता मनाई असेल. येत्या 30 एप्रिलपर्यंत म्हणजे आजपासून पंचवीस दिवसांची ही टाळेबंदी असेल. ऐंशी टक्के बाजारपेठ बंद असेल, असं सध्याचं चित्र असलं तरी सारं काही ठप्प करायचं नाही एवढं नक्की आहे. तरीही याचा मोठा फटका अर्थकारणावर होण्याची शक्‍यता आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येच्या दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यावरून आपल्यासमोरचं आव्हान समजून येईल. अंशतः टाळेबंदीचं रुपांतर पूर्ण टाळेबंदी होऊ नये यासाठी आता सर्वांनीच जबाबदारी घ्यायला हवी. हे एवढ्यावरच थांबावं हीच सर्वांची इच्छा आहे. या आव्हानांच्या पार्श्‍वभूमीवर या कठोर निर्बंधाचा फटका ज्या क्षेत्रांना प्रामुख्याने बसणार आहे, त्या क्षेत्रांतील मान्यवर सांगत आहेत प्रातिनिधिक भावना.... 


25 हजारांच्या पोटावर मार 

कोरोनाबाबत धोरण ठरवताना हॉटेल व्यवसाय जगला पाहिजे, असा विचार झालाच नाही. हॉटेल सुरू ठेवल्याने कोरोना वाढतो, असे शासनाला का वाटते? रात्री आठपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्याची मुभा द्यायला हवी होती. त्यातून निदान कामगार तरी जगवता येतील. पार्सल सेवेला फार मागणी नाही. आमचा गळा दाबू नका. 25 हजार कामगारांचे पोट या व्यवसायावर आहे. मार्चअखेरीस सर्व शासकीय कर आम्ही भरलेत. शहरात फक्त पाचच वाईन शॉप आहेत. त्यामुळे बार चालकांनाही विक्रीची परवानगी हवी. अन्यथा संघर्ष करावा लागेल. 
- लहू भडेकर, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन. तीन हजार कुटुंबांवर संक्रांत 
गेल्या वर्षभरात आम्हाला कोणतीच मदत झाली नाही. केश कर्तनालय व्यवसाय म्हणजे हातावरचे पोट आहे. थोडं सुरळीत होत असताना आता पुन्हा ब्रेक लागला आहे. या निर्णयाला आमचा विरोध आहे. जिल्ह्यात तीन हजार कुटुंबांच्या पोटावर संक्रांत आली आहे. आम्हीही सर्व नियमांचे पालन करून व्यवसाय करू. तसे आम्ही आजच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. बंदी न उठवल्यास राज्यव्यापी आंदोलन केले जाईल. 
- प्रा. सोमनाथ साळुंखे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ. एसटीपुढचे संकट मोठे 
गतवर्षी जवळपास 35 कोटींचे जिल्ह्याचे एसटीचे नुकसान झाले. थोडे सावरत असताना पुन्हा आव्हान उभे ठाकले आहे. आता अनेक मार्गांवरील फेऱ्या कमी होतील. शाळा व महाविद्यालये बंद असल्यामुळे तसेच प्रवासी संख्या विचारात घेऊन ग्रामीण भागातील कमी उत्पन्नाचे 21 हजार किलोमीटर मार्गावरील फेऱ्या बंद केल्या आहेत. तसेच रात्री 8 नंतर संचारबंदीमुळे जवळपास 4 हजार किलोमीटर मार्गावरील फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यामुळे रोजच्या 25 हजार 329 किलोमीटर मार्गावर धावणाऱ्या एसटीचे चाक थांबणार आहे. सांगली विभागातील 70 शेड्यूल अर्थात रोजच्या 88 ड्यूटी बंद कराव्या लागल्या आहेत. दिवसा लांब पल्ल्याच्या काही फेऱ्या सुरू राहतील. कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम बंद करून नियमित कर्तव्य दिले जाणार आहे. 
- अरुण वाघाटे, प्रभारी विभाग नियंत्रक. "पडद्या'समोरही कायमचा अंधार 
गतवर्षी 15 मार्चनंतर जवळपास दहा महिन्यांनंतर चित्रपट व नाट्यगृहांना परवानगी मिळाली. दरम्यान चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. जिल्ह्यात चित्रपटगृहांना परवानगी मिळाल्यानंतर सिंगल स्क्रीनचे चित्रपटगृह सध्याही बंदच होते. ही बंदी अशीच राहिली तर ओटीटीच्या प्रभावामुळे बहुपडदा चित्रपटगृहेही कायमची संपतील. मुक्ता मल्टिप्लेक्‍समध्ये चारपैकी दोन स्क्रीन, विजयनगर येथील ऑरम आणि मिरजेतील देवल अशा तीन ठिकाणीच सध्या चित्रपट प्रदर्शित होत होते. थोडे प्रेक्षक वाढत होते. आता पुन्हा निर्बंधामुळे मोठ्या संकटाचे सावट आहे. 
- सचिन वाले, व्यवस्थापक, मुक्ता मल्टिप्लेक्‍स. 


आंदोलनांनंतर हाती शून्यच 
राज्यभर आंदोलने केल्यानंतर जीम सुरू झाल्या; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे अद्याप जीम पूर्ववत क्षमतेने सुरू नव्हत्या. आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील जवळपास दोनशे जीमना टाळे लागतेय. जीमबरोबर इनडोअर खेळातील बॅडमिंटन, योगा वर्ग यांनाही निर्बंधाचा फटका बसणार आहे. कोरोनाच्या काळात तब्येत व्यवस्थित ठेवण्यासाठी व्यायाम, खेळ आणि योगा आवश्‍यक असल्यामुळे त्यांना परवानगी द्यावी अशी आमची मागणी आहे. 
- इनायत तेरदाळकर, व्यायाम प्रशिक्षक. 


पुजाऱ्यांसमोर जगण्याचे प्रश्‍न 
महापूर आणि कोरोनाचे सलग दोन वर्षे संकट आणि आता पुन्हा तेच. मंदिर बंद असं पहिल्यांदाच झाले. भाविकांचा ओढा कमी झाला. मंदिराच्या दैनंदिन व्यवस्थापनातही अडचणी येत आहेत. बागेतले गणपती मंदिर किंवा एकूणच खेडोपाड्यातील मंदिरांमध्ये फारशी गर्दी नसतेच. त्यामुळे आता गर्दी होतेय, म्हणून टाळे लावण्यात काय हशील होणार? सुरक्षा नियमांचे पालन होत होतेच. जिल्ह्यातील किमान हजारांवर मंदिरांवर अवलंबित पुजाऱ्यांच्या रोजीरोटीकडे शासनाने पाहावे. आता त्यांच्यासमोर जगण्याचेच प्रश्‍न आहेत. 
- मयुरेश ताम्हणकर, पुजारी, बागेतील गणपती मंदिर हरिपूर.

संपादन : युवराज यादव