साखळी कोरोनाची तोडा मानवतेची मनाने जोडा 

शेखर जोशी
गुरुवार, 9 एप्रिल 2020

सांगली- बे वजह घर से निकलने की जरूरत क्‍या है 
मौत से आँखे मिलाने की जरूरत क्‍या है 

ही कविता कोरोनासाठी केलेल्या लॉकडाऊनसाठी अगदी सुयोग्य आहे. ती फेसबुकपासून अनेक सामाजिक माध्यमांत शेयर केली जात आहे. ही कविता नक्‍कीच समकालीन स्थितीला लागू आहे. कारण लॉकडाऊन नसेल तर एक माणूस चारशे लोकांना बाधीत करू शकतो हे सप्रमाण सिध्द झाले आहे. त्यामुळे या इशाऱ्यातून काय समजून घ्यायचे ते घ्या...तरी देखील किरकोळ कामासाठी बाहेर पडणाऱ्या चार हजार दुचाकी आणि तीनशे चार चाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत, यावरून आपल्याकडे सर्वांनी जागरुकता दाखवली तरी काही लोक बाहेर पडून कोरोनाला आपल्याशी जोडू शकतात हे भय कायम आहे!

सांगली- बे वजह घर से निकलने की जरूरत क्‍या है 
मौत से आँखे मिलाने की जरूरत क्‍या है 

ही कविता कोरोनासाठी केलेल्या लॉकडाऊनसाठी अगदी सुयोग्य आहे. ती फेसबुकपासून अनेक सामाजिक माध्यमांत शेयर केली जात आहे. ही कविता नक्‍कीच समकालीन स्थितीला लागू आहे. कारण लॉकडाऊन नसेल तर एक माणूस चारशे लोकांना बाधीत करू शकतो हे सप्रमाण सिध्द झाले आहे. त्यामुळे या इशाऱ्यातून काय समजून घ्यायचे ते घ्या...तरी देखील किरकोळ कामासाठी बाहेर पडणाऱ्या चार हजार दुचाकी आणि तीनशे चार चाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत, यावरून आपल्याकडे सर्वांनी जागरुकता दाखवली तरी काही लोक बाहेर पडून कोरोनाला आपल्याशी जोडू शकतात हे भय कायम आहे! 

"भय इथले संपत नाही...' या ग्रेस यांच्या कवितेचा प्रत्यय क्षणक्षणाला आपल्याला भोवती घडणाऱ्या घटनांतून येतो आहे. तरी देखील अनेकांचे मन बाहेर पडण्यासाठी बचैन आहे. अगदी "जान हथेली पर' घेवून हातात पिशवी आणि तोंडाला रुमाला बांधून लोक बाहेर पडतात. कोरोना कोणाची जात, धर्म आणि राजा की रंक बघत नाही. कारण इंग्लडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना अभेद्य सुरक्षेचे कवच असूनही कोरोना झाला आहे. आणि कळपाने नाही पण सतत एकटाच फिरणारा प्राणी म्हणून प्रसिध्द असलेल्या वाघालाही माणसाच्या संपर्कामुळे कोरोना झालेला आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन व्यक्‍तित किमान सहा फूट अंतर ठेवणे आणि बाहेर न पडणे या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती या जागतिक संकटात मानवतेची साखळी मनाने जोडण्याची ! 

"मास्क लावलाय की...' "सांगलीचं पाणी ज्यानं पचवलं त्याला काय होतंय?', या भ्रमात आपल्याला काही होणार नाही, असे म्हणत काही जण वाघासारखेच वावरत असतात. पण त्यांनी भानावर यावेच! अगदीच वैद्यकीय सेवेची गरज असेल तर तुम्हाला कोणी अडविणार नाही, पण पोलिस गाड्या जप्त करतात तरी लोक छोट्याशा गोष्टीसाठी बाहेर पडतात. काही मॉर्निंग वॉकला तर काही इव्हिनिंग वॉकला तर काही जण रात्री जेवल्यावर शतपावलीच्या नावाखाली येथील 80 फुटी, 100 फुटी रस्त्यावर फिरताना पहायला मिळतात. मुलंसुध्दा गल्लीबोळांतील रस्त्यावर बॅडमिन्टनसारखे खेळ खेळताना दिसतात. या सर्वांनी "एक व्यक्‍ती किती लोकांना बर्बाद करू शकते, किती मोठा मृत्यूचा गुणाकार सुरू होऊ शकतो' हे विधान कोरोना संकट संपेपर्यंत घरातील भिंतीवर लिहून ठेवावे म्हणजे लक्षात राहिल...कारण प्रत्येक वेळी मृत्यू आणि तुम्ही यांच्यामध्ये अडविण्यासाठी पोलिस तैनात असतीलच असे नाही. मिरजेत सार्वजनिकपणे प्रार्थना करताना चाळीस जणांना पोलिसांनी पकडले तर आज शिपूर येथे एका धार्मिक मिरवणुकीत वीस जणांना. या गोष्टी कोरोनाचे भान नसल्याच्याच द्योतक आहेत. 

कोरोनामुळे जगातील विकसीत राष्ट्रांत जे मृत्यूचे थैमान सुरु आहे, ते दूरचित्रवाणीवर पाहिले तर रस्त्यावर बाहेर पडू नका यासाठी कोणी प्रबोधन करण्याची गरज वाटू नये. जगाचे कशाला, भारतात जे सत्तर हायरिस्क जिल्हे आहेत त्यात सांगली जिल्ह्याचा समावेश आहे, हे अनेकांना माहित नाही. कारण ज्या परदेशी जावून आलेल्या इस्लामपूरातील काही प्रवाशांमुळे 26 जण आपल्याकडे बाधीत झाले. पण ही संक्रमणाची इस्लामपूर येथील साखळी सोडली तर आपल्याकडे अन्यत्र पॉझिटव्ह आढळलेले नाहीत. परदेश वारी करून आतापर्यंत 1500 जण आले आहेत त्यांच्यापैकी 196 विलगीकरण कक्षात तर 713 जणांना त्यांच्या घरातही विलगीकरणाचा शिक्‍का मारून ठेवण्यात आले आहे. यापैकी बरेच जण धोकामुक्‍त झाले आहेत. सांगली-मिरज शहरासह सर्व जिल्ह्यात (इस्लामपूर वगळता) कोठेही कोरोनाचा प्रसार झालेला नाही. याबाबत आपण सर्वांनी घेतलेली खबरदारी आणि आपले सुदैव देखील आहे. वेळीच सरकारने घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय आणि यासाठी प्रशासनाने घेतलेली मेहनत आणि त्याला आपल्या जनतेने दिलेले सहकार्य यामुळेच हे शक्‍य झाले आहे.

 
महापुराच्या पाठोपाठ लगेच आलेल्या या संकटामुळे आपण सावध व्हायला हवे. कारण, आपल्याकडे महापुरात अनेक स्वयंसेवी संस्थांनी जेवणापासून ते जीवनावश्‍यक वस्तू पुरवणाऱ्यापर्यंत मदत केली...याबद्दल त्यांचे सत्कारही करण्यात आले. महापुरावेळी जी मानवीसाखळी उभी राहिली ती त्यावेळची गरज होती. पण अनेक जण "कृष्णेचा पूर' आणि "कोरोनाची साथ' या दोन गोष्टीतील फरकच लक्षात घेत नाहीत ! अगदी सुरवातीला लक्षणे नसतानाही राज्यात अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पण यावेळी मदत करणारे काही अपवाद सोडले तर सर्वंजण मदतीसाठी गर्दी करतात आणि मास्कदेखील वापरण्याचे भान ठेवत नाहीत, असे फेसबुकवरून प्रसिध्द होत असलेल्या फोटोतून दिसून येत आहे.

बॅंकांमध्ये गर्दीच्या रांगा कशाचे द्योतक आहे? मदत मिळविण्यासाठी होणारी एकत्र गर्दी टाळता येणार नाही काय? मदतकार्य नक्‍कीच गरजेचे आहे, पण यासाठी दोन व्यक्‍तींमध्ये जे अंतर ठेवा असे तज्ज्ञ सांगत आहेत, त्याकडे दुर्लक्ष होणे, हाच सध्या चिंतेचा विषय आहे. अर्थात यासाठी प्रशासनात काम करणारे काही अधिकारीसुध्दा काळजी घेताना दिसत नाहीत, यामुळे कोरोनाचे भान अजूनही आपल्याला आलेले नाही असेच म्हणावे लागले. मात्र आता 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन आणखी वाढू शकते...पण यामध्ये सर्वांनाच कमीअधिक याचा फटका बसणार आहे. सरकारी, निमसरकारी तसेच विविध संस्थांतून नोकऱ्या करणाऱ्यांना त्यांचे पगार मिळतील, पण ज्यांची हातावरची पोटे आहेत त्यांचे काय? असे सवाल समाज माध्यमातून विचारले जात आहेत.

आपला जिल्हा तर कृषी उत्पन्नांवर अधिक अवलंबून आहे. ऊस, द्राक्षे, डाळिंब, भाज्या आणि दुध उत्पादन ही आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रमुख स्त्रोत आहेत. पण सध्या तरी सारी जागतिक व्यवस्थाच या संकटापुढे हैराण आहे. कारण असे संकट आपली पिढी पहिल्यांदाच अनुभवत आहे. पहिल्या-दुसऱ्या महायुध्दाचे भीषण परिणाम आणि देवी, प्लेगसारख्या साथींचे थैमान जुन्या पिढ्यांनी अनुभवले आहेत. महायुध्दात झालेल्या मानवी संहारानंतर जगभरातील साहित्यात त्याचे प्रतिबिंब उमटले. कवितांपासून चित्रपटापर्यंत अनेक कलाकृतींनी मानवाच्या जीवाची किंमत किती कस्पटासमान आहे हे अधोरेखित केले. तोच दाहक अनुभव आता या विषाणुंच्या संक्रमणाने दिला आहे. पण आपल्या आणि नव्या स्क्रिन एज जनरेशनला हे सारेच भान पहिल्यांदाच दिले आहे. आता यातून जगण्याचा नवा दाहक अनुभव विविध माध्यमातून व्यक्‍त होईल. भविष्यात यावर औषधे निर्माण होतील, पण "जो हौदसे गई वो बुँद से नही आती' त्यामुळे जगाबरोबर आपलेही नुकसान आहे ते आपणही सोसायला हवे आणि पुन्हा कोरोना देशातून हद्दपार केल्यावर लोकांना सावरायला हवे! पण सध्या पहिले प्राधान्य आपलाच जीव वाचविण्यासाठीच! त्यासाठी घरातून बाहेर पडू नका आणि आपली सांगली चांगली जपा!  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: break the chain's corona..and connect the heart of humanity