ब्रेक टेस्ट ट्रॅकच्या जागेचा प्रश्‍न मार्गी 

मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

सातारा - धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत वर्ये (ता. सातारा) येथील गायरानातील दोन हेक्‍टर जागा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नावावर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिले आहेत. त्यामुळे गेले वर्षभर लालफितीत अडकलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकच्या जागेचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला. परिणामी वाहनधारकांची कऱ्हाडला होत असलेली फरफट थांबण्याचा मार्ग मोकळा झाला. 

सातारा - धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत वर्ये (ता. सातारा) येथील गायरानातील दोन हेक्‍टर जागा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नावावर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिले आहेत. त्यामुळे गेले वर्षभर लालफितीत अडकलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकच्या जागेचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला. परिणामी वाहनधारकांची कऱ्हाडला होत असलेली फरफट थांबण्याचा मार्ग मोकळा झाला. 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होत असलेल्या काही चुकीच्या कार्यपद्धतीबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान राज्यातील काही उपप्रादेशिक परिवहन विभागांकडे वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्‍यक असलेला ब्रेक टेस्टिंग ट्रॅक नसल्याचे समोर आले. त्यानुसार 31 जानेवारीपर्यंत ट्रॅकची सोय उपलब्ध करावी, अन्यथा संबंधित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने फिटनेस प्रमाणपत्र देणे बंद करावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार 31 जानेवारीपासून सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील फिटनेस प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या सातारा, फलटण, खंडाळा, वाई, जावळी, महाबळेश्‍वर, कोरेगाव, खटाव, माण तालुक्‍यांतील वाहनधारकांची पंचाईत होत आहे. त्यावर उपाय म्हणून कऱ्हाड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ही तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा टेस्ट ट्रॅक निर्मितीचा प्रस्ताव एक वर्षापासून लालफितीच्या कारभारात लटकला होता. 

टेस्ट ट्रॅकसाठी सुरवातीला चिंचणेर वंदन येथील जागा पाहण्यात आली होती. मात्र, ग्रामसभेची परवानगी मिळाली नसल्याने तो प्रस्ताव बारगळला. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसलेंच्या पुढाकारातून महामार्गालगत असलेल्या वर्येच्या (ता. सातारा) गायरानातील जागा निश्‍चित झाली. त्याला ग्रामसभेची मंजुरीही मिळाली. त्यानंतर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडून या प्रस्तावाला मान्यता मिळाली. त्यानंतर तो मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवला होता. तीन महिने त्यावर निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे वाहनधारकांना कऱ्हाडला जाण्यासाठी धावपळ होत होती. ही जागा तातडीने मिळावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. त्याला अखेर यश आले. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनीही संबंधित गायरानातील दोन हेक्‍टर जागा उपप्रादेशिक परिवहन विभागाला देण्याबाबत सोमवारी (ता. 5) आदेश दिले. उपप्रादेशिक परिवहन विभागाने संबंधित टेस्ट ट्रॅकच्या उभारणीच्या खर्चाचा आराखडा तयार करण्याबाबतचे पत्रही दिले आहे. जमिनीचा प्रश्‍न मार्गी लागल्याने ब्रेक टेस्ट ट्रॅकचा प्रश्‍न लवकरच सुटणार आहे. 

...या कारणांसाठी दिली जागा 
जिल्हाधिकाऱ्यांनी जागा देण्याबाबत दिलेल्या आदेशामध्ये ब्रेक टेस्ट ट्रॅक, कर न भरल्यामुळे अटकावून ठेवलेली वाहने लावण्यासाठी, संगणकीय ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक तसेच स्वयंचलित अद्ययावत वाहन तपासणी केंद्र तयार करण्यासाठी ही जागा देण्यात येत असल्याचा उल्लेख केला आहे.

Web Title: Break test track land issue sloved