सोलापुरात उडान सेवेचे भवितव्य अंधारात

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पुढील आदेश होईपर्यंत चिमणी पाडता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश महापालिकेस प्राप्त झाला आहे.त्यामुळे न्यायालयाच्या पुढील आदेशाची आम्ही वाट पहात आहोत.
- संदीप कारंजे, नगर अभियंता

सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाने पुढील निर्णय होईपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात केलेल्या उडान योजनेचे भवितव्यही अंधारात असणार आहे. 

कोणत्याही विमानसेवेला चिमणीचा अडथळा नाही असे स्पष्टीकरण कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. साखर कारखाना 1971 मध्ये सुरू झाला, तर विमानसेवा 1987 ला सुरु झाली. कारखाना उभारण्यात आलेल्या पहिल्या चिमणीची उंची 50 ते 55 मीटर आहे. को-जन चिमणी काही वर्षांपूर्वी उभारली, तिची उंची 85 मीटर आहे. ही चिमणी आता 30 मीटर करा असे सांगितले जात आहे. मात्र इतक्या कमी क्षमतेच्या चिमणीच्या साह्याने प्रकल्प राबविणे शक्य नसल्याचा दावाही श्री. काडादी यांनी केला होता. 

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे चिमणी पाडण्याची कार्यवाही तूर्त थांबणार आहे. आता पु्न्हा सुनावणी होऊन निकाल कधी लागेल, त्यानंतरच चिमणीचे पुढे काय होणार याचे भवितव्य ठरणार आहे. चिमणी पाडण्यासाठी महापालिकेने मक्तेदारही नियुक्त केला आहे. पहिल्या वेळी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियावेळी 23 लाख रुपयांचा मक्ता मंजूर करण्यात आला होता. आता सुमारे 36 लाख रुपये या कामासाठी दिले जाणार आहेत. मात्र ही बाब आता न्यायप्रविष्ठ झाल्याने चिमणीचे भवितव्य निकालावर अवलंबून असणार आहे.

पुढील आदेश होईपर्यंत चिमणी पाडता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश महापालिकेस प्राप्त झाला आहे.त्यामुळे न्यायालयाच्या पुढील आदेशाची आम्ही वाट पहात आहोत.
- संदीप कारंजे, नगर अभियंता

Web Title: break on Udan scheme in Solapur