प्रवासात करा नाश्‍ता केवळ 30 रुपयांत 

सरदार करले - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - पुण्या-मुंबईला जाण्यासाठी एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. एसटीने निश्‍चित केलेल्या हॉटेलमध्ये अवघ्या 30 रुपयांत नाश्‍ता आणि चहा मिळणार आहे. ही योजना आजपासून सुरू झाली आहे. 

कोल्हापूर - पुण्या-मुंबईला जाण्यासाठी एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. एसटीने निश्‍चित केलेल्या हॉटेलमध्ये अवघ्या 30 रुपयांत नाश्‍ता आणि चहा मिळणार आहे. ही योजना आजपासून सुरू झाली आहे. 

एरवी एसटीने प्रवास करायचा म्हणजे कंटाळवाणे वाटते. शिवाय दीर्घ पल्ल्याच्या मार्गावर एसटी चालक महामार्गावरील ढाबा, हॉटेल यासारख्या ठिकाणी एसटी चहापाण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे गाडी थांबवतात. या ठिकाणी प्रवासी उतरून चहापाणी घेतात. पण दर अव्वाच्या सव्वा लावत प्रवाशांची लूट केली जाते. चहापाण्यासाठी थांबण्यासाठी एसटी महामंडळ हॉटेलची निवड करते आणि त्यांच्याबरोबर एक वर्षाचा करार केला जातो. पण प्रवाशांची लूट काही थांबत नाही. चहा-नाश्‍त्याचे दर निश्‍चित असत नाही. गडबडीत अगोदर कोणी चौकशीही करत नाही. जे नेहमी प्रवास करतात, त्यांना याची माहिती असते. चार-पाच तासाच्या प्रवासात चालकांना विश्रांती म्हणून एसटी थांबवली जाते. पण हॉटेल, ढाबाचालक प्रवाशांची लूट करतात. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांची ही लूट थांबवण्यासाठी प्रवासी योजना आणली आहे. मंडळाने काही हॉटेलशी करार केला असून या हॉटेलमध्ये नाश्‍ता आणि चहा फक्त तीस रुपयांत मिळणार आहे. शिरा, पोहे, उपमा, इडली, वडा पाव, मेदू वडा यापैकी एकच नाश्‍ता प्लेट ग्राहकांच्या आवडीनुसार व त्याबरोबर चहा मिळणार आहे. त्यासाठी फक्त 30 रुपये मोजावे लागणार आहेत. 

कोल्हापूर-पुणे महामार्गावर सातारा विभागाने हॉटेल्स निश्‍चित केली असून नुपुर, साईसेवा (अतीत), आकाश, रुची गार्डन (भुईंज), हॉटेल राही या हॉटेलमध्ये 30 रुपयांत नाश्‍ता व चहा उपलब्ध होणार आहे. महामार्ग क्रमांक चारवर मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पूर्वी खानापूर येथील फूड प्लाझा व मॉल येथे एसटी थांबत असे. मात्र इतक्‍या कमी दरात नाश्‍ता देणे परवडत नसल्याचे हॉटेल चालकांनी सांगितल्याने त्यांचा थांबा रद्द करण्यात आला असूून आता लोणावळा येथील हॉटेल सेंटर पॅलेसमध्ये ही सेवा दिली जाणार आहे. 

जादा दर लावल्यास करा तक्रार 
एसटी महामंडळाने कराराने निश्‍चित केलेल्या हॉटेल्समध्ये ही योजना उपलब्ध असणार आहे. त्यापैकी कोणी जादा पैशाची मागणी केल्यास थांबा रद्द होऊ शकतो. प्रवासी ग्राहकांची काही तक्रार असेल तर महामंडळाने तक्रार करण्यासाठी दूरध्वनी क्रमांकही दिला आहे. या योजनेचे फलक लवकरच ठिकठिकाणी लावले जाणार असून एसटी बसेसमध्येही योजनेचे फलक लावले जाणार आहेत. 

Web Title: Breakfast on a journey to Rs 30