अंत्ययात्रेवेळी पूल कोसळला; ८ जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

महाबळेश्‍वर - येथून ३० किलोमीटर अंतरावरील दुर्गम भागातील खरोशी गावात ओढ्यावरील लोखंडी पूल (साकव) कोसळल्याने आठ जण जखमी झाले. त्यातील दोघांना जास्त मार लागल्याने उपचारासाठी पाचगणीत दाखल करण्यात आले आहे. अंत्ययात्रा जात असताना आज सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली. 

या दुर्घटनेत विजय शंकर कदम (वय ३६), रमेश भीमराव कदम (३२), लक्ष्मण परशू कदम (५६), रमेश धोंडू कदम (४३), अशोक पांगू कदम (४२), रामचंद्र भीमराव कदम (६०), भीमराव भागू कदम (६१) व राजाराम शंकर कदम (५६) हे जखमी झाले आहेत. खरोशीत काल (ता. २९) रात्री कृष्णाबाई चांगू कदम (वय ९५) यांचे निधन झाले. आज सकाळी स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा निघाली होती. रस्त्यावरील मंदिराच्या मागील ओढ्यावरील लोखंडी साकवावरून अंत्ययात्रा जात असताना अचानक मध्यभागी साकव कोसळल्याने मृत व्यक्तीस नेणारे व त्यांचे नातेवाईक ओढ्यात सुमारे १५ ते २० फूट खोल खाली पडले. 

अपघात घडताना मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित असल्याने तसेच वाहनेही उपलब्ध असल्याने तातडीने मदतकार्य मिळाले. सर्व जखमींना तळदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉ. अजित प्रभाळे यांनी जखमींवर उपचार केले. दोघांना छाती व डोक्‍याला मार लागल्याने जखमींपैकी विजय कदम व रमेश कदम यांना पुढील उपचारासाठी पाचगणी येथील बेल एअर येथे दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी हे मृताचे नातेवाईक आहेत. दरम्यान, सकाळी ११ वाजता घटना घडूनही दुपारी उशिरापर्यंत शासन किंवा प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.

Web Title: bridge collapsed at the end of the funeral