नीरा नदीवरील पुलास धोका; सातारा-पुणेला जोडणारा दुवा बनतोय कमकुवत  

किरण बाेळे
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

सांगवी ः जुन्या पुलाचे कठडे तुटल्याने प्रवास धोकादायक झाला आहे.
 

फलटण शहर  ः सातारा व पुणे जिल्ह्यांना जोडणारा नीरा नदीवरील पूल कमकुवत बनला असून, या पुलावरून अवजड वाहने ये-जा करताना जाणवणारी थरथर अन्य वाहनचालकांच्या हृदयाची धडधड वाढविणारी ठरत आहे. 
या पुलाशेजारील अर्धवट असणाऱ्या पुलाचे काम त्वरित मार्गी लावण्याची मागणी होत आहे. वीर धरणातून नीरा नदीतून पाणी सोडल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. फलटण-बारामती मार्गावर सातारा व पुणे जिल्ह्याला जोडणारा पूल नीरा नदीवर सांगवी पुलावरील संरक्षक कठडे गायब झाले असून, ते अपघातास निमंत्रण ठरत आहे. 60 ते 65 वर्षांपूर्वी दगडी बांधकामातील पूल सध्या कमकुवत झाल्याने अवजड वाहन जाताना थरथर करत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोल व रहदारी टाळण्यासाठी कोल्हापूर, मिरज, सांगली येथून औरंगाबाद, जळगाव व मराठवाड्यातील अन्य ठिकाणची मालवाहतूक याच रस्त्याने होत असते. या वाहतुकीत गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, यामध्ये अवजड वाहनांचाही समावेश आहे. या पुलावरून जाताना अवजड वाहनांमुळे होत असलेली थरथर स्पष्टपणे जाणवत असल्याने ती अन्य वाहनचालक व प्रवाशांच्या छातीमधील धडधड वाढवत आहे. शिरवळ-लोणंद-फलटण-बारामती या मार्गास चौपदरीकरणाची मंजुरी मिळाली असली तरी अनेक ठिकाणी या रस्त्याची कामे अर्धवट आहेत. सातारा व पुणे जिल्ह्यांच्या सीमेवरील नीरा नदीवर जुन्या पुलालगत चौपदरीकरणात मंजूर झालेला नवीन पूल रखडला आहे. गेली अनेक वर्षे या पुलाचे काम ठप्प आहे. नुकताच कऱ्हाड येथे कृष्णा नदीवरील जुना पूल वाहून गेला आहे, तसेच महाड येथील सावित्री नदीवरील पुलासारखी दुर्घटना होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा या जुन्या पुलावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी येथील नवीन अर्धवट पुलाचे काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी या परिसरातील नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे. 

वाळू उपशाचा फटका बसणार 

दोन जिल्ह्यांना जोडणारा नीरा नदीवरील हा पूल धोकादायक बनला आहे. अवजड वाहतुकीबरोबर या पुलाच्या परिसरात होत असलेला बेसुमार वाळू उपशाचा फटकाही या पुलास बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गेल्यावर्षी फलटण ते बारामती या रखडलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता झाला असला तरी पूल केव्हा होणार, असा सवाल या परिसरातून व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bridge connecting Satara-Pune is becoming weaker