पंचगंगेवरील पूल इचलकरंजीत खचला

संजय खूळ
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

इचलकरंजी येथील पंचगंगा नदीवर दोन पूल आहेत. त्यातील छोटा पूल हा सुमारे 70 वर्षांपूर्वीचा आहे तर, मोठा पूल 1986 मध्ये पूर्ण झाला आहे. हा पूल यापूर्वीसुद्धा मध्यभागी एकदा खचला होता.

इचलकंजी : महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणारा इचलकरंजी येथील पंचगंगा नदीवरील मोठा पूल आज (शुक्रवार) खचला असल्याचे निदर्शनास आले. यामुळे या दोन राज्यांना जोडणारा मार्ग सुरू सुरू होण्यास पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. गेली 12 दिवस हा मार्ग बंद होता.

इचलकरंजी येथील पंचगंगा नदीवर दोन पूल आहेत. त्यातील छोटा पूल हा सुमारे 70 वर्षांपूर्वीचा आहे तर, मोठा पूल 1986 मध्ये पूर्ण झाला आहे. हा पूल यापूर्वीसुद्धा मध्यभागी एकदा खचला होता. त्यावेळी त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. गेले 10 ते 12 दिवस पुराच्या प्रचंड पाण्यामुळे हा मार्ग बंद होता. आज या मार्गावरील पाणी कमी झाले मात्र, या पुलावर सुमारे तीन ते चार फूट कचरा साठला होता. हा कचरा काढण्याचे काम आज नगरपालिकेने सुरू केले. त्यावेळी हा पूल मोठ्या प्रमाणात खचला असल्याचे स्पष्ट झाले.

या पुलाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोल्हापूर निघाले आहेत. तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. मुळात सध्या पंचगंगा नदीवर असलेला जुना पूल सुद्धा अद्यापही पाण्याखाली आहे. त्यामुळे गेले 15 दिवस ठप्प असलेली वाहतूक आणखी काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. हा मार्ग सुरू झाला म्हणून अनेक नागरिक या मार्गाने येत होते मात्र, आता त्यांना पायपीट करत जावे लागत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bridge damaged in Ichalkaranji