जलपर्यटनातून किल्ल्यांना ऊर्जितावस्था आणू - संभाजीराजे छत्रपती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

कोल्हापूर - जलपर्यटनातून किल्ल्यांना ऊर्जितावस्था आणणार असून भविष्यात स्वच्छ कोल्हापूर व पंचगंगा नदी प्रदूषणमुक्‍तीचा प्रश्‍न आपल्या अजेंड्यावर असणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोल्हापूर - जलपर्यटनातून किल्ल्यांना ऊर्जितावस्था आणणार असून भविष्यात स्वच्छ कोल्हापूर व पंचगंगा नदी प्रदूषणमुक्‍तीचा प्रश्‍न आपल्या अजेंड्यावर असणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संभाजीराजे म्हणाले, 'रायगड किल्ला माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पाच मॉडेल किल्ले विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रायगडासाठी सहाशे कोटींचे बजेट आहे. त्यातील दोनशे कोटी रुपयांत रस्ते तयार करायचे असून चारशे कोटी रुपयांत किल्ला व त्याच्या परिसराचा विकास करायचा आहे. सिंधुदुर्गसाठी पैसे मंजूर झाले असून त्याचा आराखडा तयार करत आहोत. केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणार आहोत. केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या हातात किल्ले आले आहेत. राज्य पर्यटनाचा ब्रॅंड ऍम्बेसेडर झाल्याने त्याचा खूप फायदा होत आहे. जलपर्यटनाच्या अनुषंगाने खांदेरी, उंदेरी, कुलाबा, मुरूड-जंजिरा, पद्मदुर्गपर्यंतचा प्रवास दीड दिवसात करता येतो. याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट घेऊन दिली आहे. त्याला जेटीची (बोट थांबण्याची जागा) परवानगी मिळाली आहे.''

ते म्हणाले, 'राज्यसभेची खासदारकी ही शिव-शाहूंचा वंशज असल्याने मिळाली आहे. तो छत्रपती घराण्याचा सन्मान आहे. शिव-शाहूंबद्दल दिल्लीत भेटणाऱ्या प्रत्येकाला उत्सुकता आहे. विशेषत: राजर्षी छत्रपती शाहूंविषयी त्यांना जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे मला जे भेटतात, त्यांना शाहूंचे चरित्रात्मक पुस्तक भेट देतो. राज्यसभेत महाराष्ट्रातील खासदारांचे वजन वाढण्यासाठी त्यांचा खूप अभ्यास असणे आवश्‍यक आहे.'' छत्रपती घराण्यावर काही पुरोगामी टीका करत असल्याच्या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले, 'शिव-शाहूंवरसुद्धा टीका झाली होती. छत्रपती घराण्यात टीका सहन करण्याची ताकद आहे. आम्ही टीकेकडे लक्ष देण्यापेक्षा विकासाच्या प्रश्‍नांशी बांधील आहोत. त्यामुळे अशा टीकेकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही.''

पंतप्रधानांकडून कौतुक
'गड-किल्ले हे काही दगडांचे जोडलेले तुकडे नाहीत. ते इतिहास आणि वर्तमानकाळाला जोडणारे सेतू आहेत. ज्यांनी ते बांधले, ज्यांचा त्यांच्याशी अतूट संबंध होता, त्यांच्या शौर्याची गाथा हे गड-किल्ले सांगतात...'' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांना पाठविलेल्या खास पत्रातील ही वाक्‍ये. गड-किल्ल्यांबद्दल संभाजीराजे यांनी टेबल कॅलेंडर प्रकाशित केले व ते मोदी यांना भेट दिले. त्यानंतर मोदी यांनी किल्ल्यांविषयी असणारी तळमळ आपल्या पत्रातून व्यक्‍त तर केलीच; शिवाय गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुकही केल्याचे संभाजीराजे यांनी या वेळी सांगितले.

संभाजीराजे म्हणाले...
- रायगडच्या आराखड्यात बदल होणे अपेक्षित
- रायगडच्या पायथ्याला शिवसृष्टीची गरज नाही
- शाहू मिलच्या जागी शाहू स्मारकापेक्षा रोजगाराभिमुख स्मारक व्हावे
- नमामि गंगेप्रमाणे पंचगंगा नदीचा मॉडर्न प्रोजेक्‍ट तयार करणार
- स्वच्छ कोल्हापूरसाठी प्रयत्नशील राहणार
- राज्याभिषेक सोहळ्यात प्रबोधनात्मक कार्यक्रम आखणार

Web Title: Bring water tourism forts reform