तुटलेले कठडे अन्‌ कोसळणाऱ्या दरडी 

तुटलेले कठडे अन्‌ कोसळणाऱ्या दरडी 

महाबळेश्वर - कोकणातून महाबळेश्वरकडे येण्यासाठी 150 वर्षांपूर्वी इंग्रजांनी तयार केलेल्या आंबेनळी घाटाची दुरुस्ती व देखभालीची गरज असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. परंतु, निर्ढावलेल्या व्यवस्थेमध्ये मोठा अपघात झाल्याशिवाय त्याकडे बघितले जात नाही, हेही दुर्दैव आहे. 

महाबळेश्वर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. मुंबई-पुणे महामार्ग वे व त्यानंतर पुणे-बंगळूर महामार्ग तयार झाल्याने येथील आंबेनळी घाटातून मधल्या काळात वाहतूक थोडी कमी झाली होती. परंतु, कोकणात पर्यटन वाढू लागल्याने आंबेनळी घाटातील वाहतूक पुन्हा वाढली आहे. या घाटातील अनेक धबधब्यांचे व निसर्गाचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी पावसाळ्यात वाहतूक वाढताना दिसते. कोकणातून देशाला जोडणाऱ्या प्रमुख घाटांपैकी हा एक मुख्य घाट आहे. इंग्रजांनी महाबळेश्वरचे हिलस्टेशन म्हणून विकसित केल्यानंतर मंबईहून येथे पोचणे सोईचे व्हावे म्हणून या घाटाची 1871 मध्ये बांधणी हाती घेण्यात आली व 1876 साली हा घाट बांधून पूर्ण झाला. हा संपूर्ण घाट सुमारे 40 किलोमीटरचा आहे. अतिशय वळणा-वळणाचा तीव्र रस्ता या घाटातून असल्याने वाहन चालवताना चालकाची अक्षरशः परीक्षाच घेतली जाते. त्यामुळे या घाटाला पूर्वी "रडतोंडीचा घाट' असे संबोधले जात होते. 

प्रतापगडहून महाबळेश्वरपर्यंत काही प्रमाणात वाहनांची वर्दळ जास्त असते. काही प्रमाणात रस्ता चांगलाही आहे. प्रतापगड ते पोलादपूर या घाटात अनेक ठिकाणी कठडे नसल्याने मातीचे भराव, मोठे दगड सरकवून रोधक तयार केले आहेत. बऱ्याच ठिकाणी तुटलेल्या कठड्यांकडे दुर्लक्ष केल्याने घाट धोकेदायक झाला आहे. दाट धुके व मुसळधार पावसामुळे अनेकदा रस्ता लक्षात येत नाही. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रिफ्लेक्‍टर बसविण्याची मागणी होत असताना दुर्लक्ष झाले आहे. 

सध्या वाई एमआयडीसीतून महाड एमआयडीसीकडे टॅंकरची वाहतूक तसेच वाईकडून भाजी घेऊन कोकणाकडे जाणारी वाहतूक रात्री मोठ्या प्रमाणात सुरू असते. प्रतापगडहून पुढे पोलादपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये पूर्वीपासून चौकी कार्यान्वित आहे. परंतु, ती तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने तेथे पोलिसांची गैरसोय होण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे दाभिल खिंडीजवळ कायमस्वरूपी चौकीची आवश्‍यकता आहे. 

घाटात दरडी कोसळण्याचा धोका 
गेल्या पावसाळ्यात येथील मेटतळे गावानजीक कोसळलेल्या दरडीमुळे काही प्रमाणात मोठा दगड येथे रस्त्याच्या बाजूलाच पडून होता. तो बाजूला हटविणे अवघड होते. त्याचबरोबर तो अर्धा रस्ता अडवून बसला होता. हा दगड हटविण्यासाठी अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुंग स्फोट करावा लागला होता. सुरुंग स्फोटाच्या हादऱ्याने काही ठिकाणी डोंगरातील दगड मोकळे झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे घाटात वारंवार दरडी कोसळण्याची भीती असते. महाबळेश्वर ते प्रतापगडपर्यंतच्या घाटात या दरडी कोसळण्याचे प्रमाण जास्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com