video : रक्षाबंधनाच्या दिवशीही भाऊ-बहिणीच्या नात्यात दुरावा

अमितकुमार टाकळकर 
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

शिरोली - रक्षाबंधन! भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला वृद्धिंगत करणारा सण! परंतु मुलीला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा देण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीपायी बहीण-भावामध्ये कायमची कट्टी झाली. कालच्या राखीपौर्णिमेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील चाकण-खेड परिसरातील हे प्रातिनिधिक चित्र नात्यांमधील दुरावा ठळक करणारे ठरले.

शिरोली - रक्षाबंधन! भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला वृद्धिंगत करणारा सण! परंतु मुलीला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा देण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीपायी बहीण-भावामध्ये कायमची कट्टी झाली. कालच्या राखीपौर्णिमेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील चाकण-खेड परिसरातील हे प्रातिनिधिक चित्र नात्यांमधील दुरावा ठळक करणारे ठरले.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुका हा अतिशय झपाट्याने विकसित होणारा भाग आहे. पुणे नाशिक महामार्ग विस्तारीकरण, एमआयडीसीचे पाच टप्पे, सेझ, विमानतळ, रिलायन्स गॅसवाहिनी, जिओ केबल खोदकाम आणि एचपीसीएल सीएनजी पाईपलाईन यामुळे येथील जमिनींचे भाव गगनाला भिडले. माळरानावर टोलेजंग वेअरहाऊस उभी राहिली. भूसंपादन झाल्याने करोडो रुपयांच्या उलाढाली वाढल्या. घरात बक्कळ पैसा आला अन इथेच माशी शिंकली.

बहिणीला समान हक्क प्राप्त झाल्याने पैसेवाटप करताना भावा-बहिणीत दुरावा निर्माण झाला. बहिणीची मुले-मुली अर्थात भाचे कंपनी देखील मामावर गुरकायला लागली. जवाईबापूचा तोरा वाढला. यामुळे अनेक भूसंपादनात हरकती घेतल्या गेल्या. भाव-बहिणीत मध्यस्थी काढताना सरकारी अधिकाऱ्यांना नकोनकोसे झाले. अनेक विनंती, सूचना, इशारे, आदेश देऊनही नात्यातील दुरावा संपेना. शेवटी कायद्याचा बडगा उगारत हजारो प्रकरणातील कोट्यवधी रुपये खेड कोर्टात वर्ग करण्यात आले. तू तू मैं मैं केल्याने हातातोंडाशी आलेला घास कोर्टात अडकल्याने भावा बहिणीतील दुरावा कधी कटुतेत निर्माण झाला याचे त्यांनाही भान राहिले नाही.

आज रक्षाबंधनाच्या सणाला राखी बांधायला माहेरी येणारी बहीण आर्थिक वादामुळे कायमची सासुरवाशीण झाली, हे कटुसत्य आज खेड तालुक्यातील जनतेला पचवायला अवघड जात आहे. नवीन पिढीसाठी रक्षाबंधन हा सणच लोप होतोय की काय हे अगतिकपणे पाहण्याचे दुर्भाग्य खेडच्या जनतेच्या नशिबी आले आहे ही मात्र वस्तुस्थिती आहे. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली भावंडे काळ्या आईच्या मोहापायी विभक्त झाली अन राखीचा धागा कमकुवत झाला.

मी ज्यांना वाढवलं, त्या भावांनीच वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी मला वाऱ्यावर सोडलं. आज राखी पौर्णिमेच्या दिवशी भाऊ बाजारात दिसला पण, बोलला नाही. रस्त्यात जाणाऱ्या जमिनीसाठी सही घेतली पण पैसे दिले नाहीत.
५० लाखांपैकी कबूल केलेले अडीच लाखही मला दिले नाहीत. 
- श्रीमती गऊबाई वाघ (बदललेले नाव)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother-sister relationship distances on the day of Raksha Bandhan