प्रियकराच्या मदतीने तासगाव तालुक्यात भावाचा खून

प्रियकराच्या मदतीने तासगाव तालुक्यात भावाचा खून

तासगाव - डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील रमेश बाळासाहेब झांबरे (वय ३०) यांचा मृत्यू अपघाती नव्हे तर सख्ख्या बहिणीने प्रियकराच्या मदतीने केलेली हत्या असल्याचे उघडकीस आले. सात सप्टेंबरला घडलेल्या या हत्येचा छडा मोबाईलमधील संभाषणावरून नाट्यपूर्ण रितीने लागला. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी बहीण सारिका संपत पाटील (वय ३२, वडगाव, ता. तासगाव) हिला प्रियकर सुधाकर तानाजी झांबरे (वय ३८, रा. डोंगरसोनी) याच्यासह अटक केली. न्यायालयाने दोघांना २४ सप्टेंबरपर्यंत कोठडी दिली आहे. 

सात सप्टेंबरला डोंगरसोनी-वाघोली रस्त्यावरील पवनचक्‍कीजवळ रमेशचा मृतदेह मिळाला. दारूच्या नशेत पडल्याने डोक्‍याला मार लागल्याने मृत्यू झाला असावा म्हणून प्रारंभी अपघाती मृत्यू अशी नोंद झाली. मात्र गावात हा मृत्यू अपघाती नसून खून असल्याची चर्चा दबक्‍या आवाजात होती. चर्चेचा रोख सारिकाच्या दिशेने होता. दरम्यान, सारिका भावाच्या मृत्यूनंतर माहेरी आली. सुतक काळात ती घरी माहेरी असताना दूर जाऊन कोणाशी तरी सतत फोनवर बोलायची. त्यातून संशय बळावला. 

दोन्ही आरोपींमधील विवाहपूर्व प्रेमसंबंधाबाबत मृत रमेशने सारिकाला वेळोवेळी समज दिली होती. त्यातून सारिका व सुधाकर चिडून होते. प्रेमसंबंधात अडथळा येतोय म्हणून दोघांनी त्याच्या हत्येचा कट रचला. सुधाकरने रमेशला ढाब्यावर जेवणासाठी नेऊन दारू पाजली. परतताना डोंगरसोनी वाघोली रस्त्यावर जड वस्तूचा डोक्‍यात प्रहार करून त्याचा खून केला व मृतदेह तेथेच टाकून पसार झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासाबाबत मार्गदर्शन केले. निरीक्षक अजय सिंदकर तपास करीत आहेत.

कॉल रेकॉर्डिंग ॲपमुळे संभाषण रेकॉर्ड 
फिर्यादी व मृत रमेशचा चुलतभाऊ ज्ञानेश्‍वर झांबरे यांनी तिच्या मोबाईलवर गुपचूपपणे ऑटो कॉल रेकॉर्डिंग ॲप डाऊनलोड केले. आज उत्तरकार्यासाठी पुरोहितांना बोलवण्यासाठी ज्ञानेश्‍वरने सारिकाकडून भटजीला फोन करण्यास मोबाईल मागून घेतला. त्यातील मेमरी कार्ड काढून घेतले. मोबाईलमध्ये सारिका आणि सुधाकर यांच्यातील संभाषण रेकॉर्ड झाले होते. त्यातून रमेशच्या हत्येचे धागेदोरे मिळाले. ज्ञानेश्‍वर यांनी अनैतिक संबंध आणि द्राक्षबागेच्या जमिनीवरून सारिका आणि सुधाकर यांनी खून केल्याची फिर्याद दिली आणि खुनाच्या प्रकाराचा उलगडा झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com