मादळमुठी येथे गलाई व्यवसायिकाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून 

दिलीप कोळी 
Sunday, 19 July 2020

ही घटना काल रात्री साडेआठच्या सुमारास मादळमुठी येथे घडली. पोलिसांनी संशयित आरोपी राहुल माळी यास रात्री अटक केली.

विटा (सांगली) : गलाई दुकानामधील भागीदारीचे पैसे व साहित्य परत मागितल्याच्या कारणावरून मादळमुठी (ता. खानापूर) येथे दोन व्यवसायिकांमध्ये झालेल्या वादातून महादेव रघुनाथ माळी (वय 29) या व्यवसायिकाचा त्याचा पार्टनर विश्वास उर्फ राहुल किसन माळी (वय 24, दोघे रा. मादळमुठी ) याने कोयत्याने पोटावर व छातीवर वार करून निर्घृण खून केला.

ही घटना काल रात्री साडेआठच्या सुमारास मादळमुठी येथे मयत महादेव माळी यांच्या घरासमोर घडली. पोलिसांनी संशयित आरोपी राहुल माळी यास रात्री अटक केली. याबाबत राजाक्का महादेव माळी यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की उत्तरप्रदेश राज्यातील सृजानगंज येथे महादेव व राहुल यांच्यात भागीदारीत गलाई व्यवसायाचे दुकान आहे. लॉकडाउनपुर्वी ते मादळमुठी येथे गावी आले आहेत. रात्री महादेव याने राहुलकडे गलाई व्यवसायातील भागीदारीचे पैसे व साहित्य परत मागितले. त्यावरून दोघांचा वाद सुरू झाला. त्यातून रागाने राहुल याने महादेवला "तुला आता जीवंत ठेवणार नाही, कुठे दुकान लावायचे आहे, तिकडे लाव', असे म्हणत त्याच्या पोटात व छातीवर धारदार कोयत्याने वार करून भोसकून गंभीर जखमी करून तेथून पळून गेला. महादेवाच्या नातेवाईकांनी महादेवला उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आणले.

परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कोयत्याने वार करून दुचाकी गाडीवरून पळून निघालेल्या राहुल माळीला लेंगरे ( ता. खानापूर ) येथे पोलिसांनी पकडले. त्यास अटक केल्याचे पोलिस निरीक्षक श्री. शेळके यांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप झालटे तपास करत आहेत. 
  
संपादन ः शैलेश पेटकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brutal murder by stabbing a Galai businessman at Madalmuthi