तारळेत बीएसएनएलची सेवा खंडित ; टपाल सेवाही ठप्प

तारळेत बीएसएनएलची सेवा खंडित ; टपाल सेवाही ठप्प

तारळे ः विभागात "बीएसएनएल'ची सेवा खंडित झाल्याने गैरसोय सुरू आहे. 20 दिवसांपासून मोबाईलचे ग्राहक संपर्काबाहेर गेले आहेत. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसत आहे. टपाल कार्यालयात ब्रॉडबॅंड बीएसएनएल इंटरनेट असल्याने व्यवहार रखडले असून, ग्राहकांच्या संतापात भर पडली आहे. अनेकदा अनुभव येऊनही टपाल कार्यालयाला पर्यायी व्यवस्था शोधण्यात अपयश आले आहे. यात ग्राहकांची ससेहोलपट सुरू आहे. 
 

तारळ्यासह मुरुड व ढोरोशी येथील "टॉवर' बंद झाले, ते 20 दिवसांनंतरही बंदच आहेत. तारळे टॉवरचे सुमारे 65 हजार रुपये वीज बिल थकीत झाल्याने "महावितरण"ने वीज तोडली होती. 20 दिवसांपासून दूरसंचार निगमच्या अधिकाऱ्यांनी वीज बिल भरण्याकडे कानाडोळा केला आहे. मोबाइलधारक हवालदिल झाले आहेत, त्याशिवाय व्यवहारांवर परिणाम झाले आहेत. महाराष्ट्र बॅंकेचे व्यवहार मंद गतीने सुरू आहेत. मात्र, टपाल कार्यालयातील व्यवहार ठप्पच आहेत. 

बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. मात्र, टपाल कार्यालय 20 दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे विभागातील रोकड व्यवहार थांबले आहेत. तसेच स्पीडपोस्ट, रजिस्टर पार्सल आदी कामेही खोळंबली आहेत. येथील अधिकारी अतितातडी असणाऱ्या ग्राहकांचे व्हाउचर्स उंब्रज येथे मारून पैसे देत आहेत. त्याशिवाय महत्त्वाची टपाल ऑफलाइन दिल्याने काही ग्राहकांची सोय झाली असली तरी मोठ्या संख्येने गैरसोय सुरूच आहे. यामुळे ग्राहक व कर्मचारी अधिकारी यांच्यात वाद होत आहेत. सातारा कार्यालयात याबाबत माहिती घेतली असता, आम्ही वरिष्ठांना बोललो असून, मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहे, असे मोघम उत्तर मिळाले. मात्र, "बीएसएनएल'वर पूर्णतः टपाल कार्यालय अवलंबून असल्याने ते लवकर सुरळीत होईल का, याबाबत शंकाच आहे. यात ग्राहक मात्र भरडला जात आहे. 

वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष घालून याची कायमची तजवीज करणे गरजेचे आहे, अन्यथा लोकांच्यात उद्रेकाची स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com