बसपाच्या नगरसेवकाचे तीन लाखांचे मानधन हडप

विजयकुमार सोनवणे
रविवार, 16 डिसेंबर 2018

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत पराभव झालेल्या नगरसेवकांचे मानधन हडपण्याचा डाव त्यावेळी उघडकीस आला होता. तब्बल 72 पराभूत नगरसेवकांचे धनादेश तयार असूनही ते देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मात्र, बातमी प्रसिद्ध झाल्यावर मानधनाचे वाटप झाले.

सोलापूर : नगरसेवक म्हणून मिळालेल्या गेल्या टर्ममधील मानधनाचे सुमारे तीन लाख रुपये पोस्टाच्या आवर्तक ठेवीच्या नावाखाली हडप करण्यात आली आहे. नगरसचिव कार्यालयाने त्याचा अद्याप हिशेब दिला नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केला. 

अशाच पद्धतीने पराभूत नगरसेवकांचे मानधन हडपण्यात आल्याचा पर्दाफाश "सकाळ'ने जून 2017 मध्ये केला होता. त्याची चौकशी सुरू झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, सध्या तो कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने लाखो रुपयांची माया "गायब' झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने याबाबत वेळीच दाखल घेत दोषीवर कारवाई न करता संरक्षण दिले. त्यामुळे भविष्यात अशा अनेक घटना समोर येण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत पराभव झालेल्या नगरसेवकांचे मानधन हडपण्याचा डाव त्यावेळी उघडकीस आला होता. तब्बल 72 पराभूत नगरसेवकांचे धनादेश तयार असूनही ते देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मात्र, बातमी प्रसिद्ध झाल्यावर मानधनाचे वाटप झाले. मात्र काही ज्येष्ठ नगरसेवकांचे लाखो रुपये "गायब'झाले. त्यापैकी काही नगरसेवक आता हयातही नाहीत. श्री. चंदनशिवे यांनी केलेल्या आरोपाबाबत प्रशासन प्रमुख आता काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: BSP corporater fund in Solapur