बुदिहाळ तलाव तब्बल 22 वर्षानंतर भरला; 4521 हेक्‍टर क्षेत्राला लाभ

नागेश गायकवाड
Friday, 16 October 2020

सांगोला तालुक्‍यात असलेला आणि पाणीसाठा आटपाडी तालुक्‍यात होणारा ब्रिटिशकालीन बुदिहाळ तलाव तब्बल 22 वर्षानंतर भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे.

आटपाडी (जि. सांगली ) : सांगोला तालुक्‍यात असलेला आणि पाणीसाठा आटपाडी तालुक्‍यात होणारा ब्रिटिशकालीन बुदिहाळ तलाव तब्बल 22 वर्षानंतर भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. पाणी पाहण्यासाठी बुदिहाळ तलावावर लोकांची गर्दी होऊ लागली असून पर्यटन स्थळ होऊ लागले आहे. 

ब्रिटिशानी दुष्काळी भागात माने गंगा नदीवर राजेवाडी तलाव आणि बेलवण नदीवर बुदिहाळ तलाव बांधले होते. भिवघाट आणि शुकाचार्य यामधून लहान-लहान नाले वाहत येऊन घाट माथ्याखाली एकत्र मिळतात. करगणी मध्ये रामघाट नाला आणि शेटफळे मध्ये वेलवण नदीमध्ये रूपांतर होते.

या नदीवर सांगोला तालुक्‍याच्या सीमेवर 1902 मध्ये ब्रिटिशांनी बुद्धेहाळ तलाव बांधला असून याचे राहिलेले का 1957 मध्ये पूर्ण झाले आहे. या तलावाचा भराव कोल्हापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍यात असून पाणी साठा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्‍यात होतो. तलावाची पाणीसाठा क्षमता 1132द.ल. घनफूट आहे तर दहा गावातील 4521 हेक्‍टर क्षेत्राला लाभ होतो.

या तलावावर दहा गावच्या सतरा पाणीवापर संस्था कामकाज पाहतात. तलावामध्ये टेंभू योजनेचे ही पाणी येते. आटपाडी तालुक्‍यातील माडगुळे आणि शेटफळे परिसरातील क्षेत्राला या पाण्याचा लाभ होतो. 

गर्दी वाढू लागली 
प्रसिद्ध ब्रिटिशकालीन बुद्धीहाळ तलाव तब्बल 22 वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. तलावालगतच दोन तटबंदी असलेले बंगले आहेत. पावसामुळे निसर्ग सौंदर्य भरले आहे. त्यामुळे त्याचा आस्वाद घेण्यासाठी लोकांची गर्दी वाढू लागली आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Budihal Lake filled up after 22 years; Benefit to an area of ​​4521 hectares