बैलाने तोरण मारण्याचा शर्यती बिदाल मध्ये उत्साहात संपन्न

रुपेश कदम
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

बैलांच्या शिंगात साधारण पाच फुट उंचीचे वाकाचे (घायपात किंवा अंबांडीचे) टोप तयार करुन त्याला साधारण १२ते १३ फुटाच्या दोन रस्या लावतात. त्याची रचना अशी केलेली असते कि ते बैलाच्या शिंगात सहज खोचुन बसवता येतात.

मलवडी : बिदाल (ता. माण) येथे महाराष्ट्रातील एकमेव बैलाने तोरण मारण्याच्या शर्यती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील 'बिदाल' हे शेतीप्रधान गाव. या गावात गेली कित्येक वर्षांपासुन बैलाच्या तोरण मारण्याच्या स्पर्धा भरवल्या जातात. ६० वर्षांपासुन सुरु असलेला हा तोरणाचा खेळ, नियमबद्ध नियोजनपुर्ण स्पर्धा स्वरुपात ३७ वर्षांपासून सुरु आहे.

बैलांच्या शिंगात साधारण पाच फुट उंचीचे वाकाचे (घायपात किंवा अंबांडीचे) टोप तयार करुन त्याला साधारण १२ते १३ फुटाच्या दोन रस्या लावतात. त्याची रचना अशी केलेली असते कि ते बैलाच्या शिंगात सहज खोचुन बसवता येतात. गावचं ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या मंदीरासमोरील पटांगणातून  बैल टोप घालुन पळवत आणून त्याला पायऱ्यावरून उडी मारायला लावतात. तिथेच साधारण १६ फुट उंचीवर तोरण बांधलेल असते. बैलाने उडी मारताना त्याच्या मानेला झटका बसुन टोपाच्या रस्या उंच वर उडतात व वरील तोरणाला त्या रस्या स्पर्श करतात याला 'तोरण मारलं' असं म्हणतात.

नागपंचमीच्या दिवशी भैरवनाथ मंदीराच्या आवारात भरविण्यात आलेल्या या स्पर्धेत यावर्षी 56 बैलांनी सहभाग घेतला. त्यातील पंचवीस बैल दुसर्या फेरीसाठी पात्र ठरले. तर अंतिम फेरीत चार बैलांनी प्रवेश मिळविला. वसंत जगदाळे, बाबूराव पिसाळ यांच्या प्रत्येकी एक तर साहेबराव बोराटे यांच्या दोन बैलांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम फेरीत कोणत्याच बैलाने तोरण न मारल्याने बक्षिसाची रक्कम विभागून देण्यात आली. वाद्यांच्या गजरात, फटाक्यांचा आतिशबाजीत व शौकिनांच्या जल्लोषात स्पर्धा संपन्न झाली. धनंजय जगदाळे, किशोर इंगवले व एच. एल. फडतरे यांनी स्पर्धेचे बहारदार समालोचन केले.

ही स्पर्धा पाहण्यासाठी आमदार जयकुमार गोरे, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी आमदार डाॅ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, सुरेखा पखाले यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Bull Competition at malwadi bidal taluka maan