"तासिका' प्राध्यापकांच्या खांद्यावर उत्तरपत्रिकांचे ओझे

तात्या लांडगे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

- रिक्‍त पदांच्या भरतीचे रोस्टर अपूर्णच
- विद्यापीठांच्या दिरंगाईमुळे प्राध्यापक भरतीला लागतोय विलंब
- तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांकडे पाचशे उत्तरपत्रिकांची जबाबदारी
- निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापींना करावी लागतेय तारेवरची कसरत

सोलापूर : उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून राज्य सरकारमार्फत 15 अकृषी विद्यापीठांतील 659 प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. मात्र, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ वगळता अन्य विद्यापीठांच्या रोस्टरचे काम अपूर्णच असल्याने भरती लांबणीवर पडली आहे. त्यामुळे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या खांद्यावर उत्तरपत्रिका तपासणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

हेही वाचाच... खुषखबर...! या शहरात येणार 100 कृषी हवामान शास्त्रज्ञ

महाविद्यालयातील अध्यापनाचे काम करून ढीगभर उत्तरपत्रिका तपासणीचे काम नको, अशी भूमिका काही प्राध्यापकांनी घेतली आहे. इंग्रजी, गणित यासह बीकॉमच्या अनेक विषयांच्या प्राध्यापकांची पदे रिक्‍त आहेत. तशातच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यादृष्टीने निकाल वेळेत लावण्याचे नियोजनात विद्यापीठांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांकडे उत्तरपत्रिका तपासणीसाठी त्यांना अध्यापनाचा किमान सहा वर्षांचा अनुभव असणे आवश्‍यक आहे. मात्र, प्राध्यापकांची पदे रिक्‍त असल्याने दोन-तीन वर्षांचा अनुभव असलेल्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर उत्तरपत्रिका तपासणीची जबाबदारी सोपविल्याचे चित्र आहे. यावर तोडगा म्हणून काही विद्यापीठांनी ऑनलाइन (ऑनस्क्रिन) उत्तरपत्रिका तपासणीचा नवा प्रयोग हाती घेतला आहे. मात्र, महाविद्यालयांमधील विषयनिहाय पूर्णवेळ प्राध्यापकांची रिक्‍त पदे भरल्याशिवाय यावर ठोस तोडगा निघणार नाही, असे चित्र पहायला मिळत आहे.

 

हेही वाचाच... अबब...729 पदांसाठी सव्वातीन लाख उमेदवार

ठळक बाबी...
- विद्यापीठांचे रोस्टर अपूर्ण असल्याने प्राध्यापक भरती लांबणीवर
- तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांकडे किमान 500 उत्तरपत्रिका तपासणीचा भार
- परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे अन्‌ वेळेत निकालासाठी विद्यापीठांना करावी लागतेय तारेवरची कसरत
- दोन वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असतानाही तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांकडून उत्तरपत्रिकांची तपासणी

 

हेही वाचाच.... निधीअभावी रखडला बळीराजाचा 'सन्मान'

उत्तरपत्रिका तपासणीसाठी तासिका तत्त्वावरील 150 प्राध्यापक
बीकॉमसह अन्य कोर्सच्या विषयांतील प्राध्यापकांची पदे रिक्‍त आहेत. बीकॉमच्या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी 30 प्राध्यापक असून आणखी 15 प्राध्यापकांची गरज आहे. मात्र, प्राध्यापकांची संख्या अपुरी असल्याने सहा वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असलेल्या तासिका तत्त्वावरील सुमारे 150 प्राध्यापकांकडून उत्तरपत्रिका तपासून घेतल्या जात आहेत.
- डॉ. श्रीकांत कोकरे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सोलापूर विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "The burden of answer sheets on the shoulders of the 'bells' professor."