थोड्याच वेळात येतो म्हणाला अन्...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

- पत्नीला म्हणाला होता थोड्याच वेळात येतो अन्...

सोलापूर : थोड्याच वेळात येतो, असे पत्नीला सांगणाऱ्या क्लिनरचा बसच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास जुना पुना नाका परिसरातील नाकोडा रेसिडेन्सी परिसरात घडली. 

गणेश वसंत सुरवसे (वय 38, रा. शिवाजी नगर, बाळे, सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गणेश हा खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये क्‍लिनरचे काम करत होता. मंगळवारी सकाळी अकरा वाजता तो घरातून कामावर आला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार गणेश हा बस खाली झोपला होता. बस मागे घेत असताना गणेशाच्या अंगावरून मागचे चाक डोक्‍यावरून नेले. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तासाभराने ही माहिती परिसरातील नागरिकांना समजली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. या प्रकरणात बस चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. 

बस बसखाली सापडून क्‍लिनर गणेश याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट आहे. मात्र, तो बस खाली का झोपला होता हे अद्याप समजले नाही, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus Driver Assistant Died in Bus Accident