यंत्रमाग व्यवसायाला नोटाबंदीचा फटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

उत्पादन व विक्रीत घट; नोटा उपलब्धतेनुसार कामगारांना आठवड्याला पगार
श्रीनिवास दुध्याल
सोलापूर - नोटाबंदीचा फटका सोलापुरातील सर्वच व्यापार-उद्योगांना कमी-जास्त प्रमाणात बसला आहे. काही व्यवसायात मंदी आहे, तर काहींना घरघर लागली आहे. सोलापुरातील विडी व यंत्रमाग व्यवसायात पूर्व भागातील निम्मी लोकसंख्या कार्यरत आहे. यातील विडी उद्योगावर संकटच ओढावले आहे. या गदारोळात यंत्रमाग उद्योग मात्र तग धरून असल्याचे चित्र दिसत आहे.

दिवाळीनंतर जून महिन्यापर्यंत चादर व टॉवेल उद्योगाचा हंगाम सुरू होतो. नेमकी दिवाळीनंतरच नोटाबंदी जाहीर झाल्याने यंत्रमागधारकांना सुरवातीला त्याचा खूप मोठा फटका बसला. नोटा बदलून घेणे, खात्यातील व्यवहार सुरळीत करणे यातच त्यांचे बरेच दिवस वाया गेले. नंतर कच्चा माल खरेदी, उत्पादन, कामगारांचे पगार आदी सुरळीत होण्यासाठी दोन आठवडे लागले. मात्र, हंगाम काळात अपेक्षित असणारे उत्पादन घटले आहे. नोटाबंदीमुळे मागणी कमी झाल्याने उत्पादनात घट झाली असून, बाजारात पैसा नसल्याने वसुली कमी झाली आहे.

यंत्रमाग उद्योगातील विविध विभागात अनेक महिला व पुरुष कामगार कार्यरत आहेत. त्यांना सध्या दर आठवड्याला रोखीने, धनादेशाने किंवा बॅंकेत ऑनलाइन पगार दिला जात आहे. या उद्योगाला पुढे चांगले दिवस येतील, या आशेवर उद्योजक व कामगार कार्यरत आहेत. नेमक्‍या हंगामावेळी नोटाबंदी लागू केल्याने महत्त्वाच्या गरजांवर; तसेच उत्पादन व विक्रीवर परिणाम झाला आहे.

एका युनिटमध्ये सात-आठ कामगार असतात. त्यांच्या पगारासाठी 25 हजारांपर्यंत रक्‍कम लागते. चालू खात्यामधून (करंट) सध्या आठवड्याला 50 हजार रोख मिळत असल्याने कामगारांना दर आठवड्याला रोख पगार देता येत आहे. सहकारी बॅंकांकडे मात्र नोटा नसल्याने रक्कम मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. पुढे सर्व काही चांगले होईल, अशी आशा आहे.
- श्रीनिवास बुरा, उपाध्यक्ष, टीडीएफ

नोटाबंदीचा आमच्या उद्योगावर फारसा परिणाम झाला नाही. मात्र, सध्या हंगाम असूनही उत्पादन व विक्रीत घट झाली आहे. विक्री नसल्याने वसुली होत नाही. त्यामुळे कामगारांना रोखीने जमेल तसे दर आठवड्याला पगार देत आहोत.
- राजेंद्र चिम्मन, कारखानदार

नोटाबंदीनंतर आम्हाला नियमित पगार मिळत आहे. आमच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन पगार दिला जात आहे. मात्र, एटीएम व बॅंकेत पैसा नसल्याने हाती पैसा पडायला वेळ लागत आहे. हंगाम असूनही मंदीची अवस्था आहे.
- अशोक राजूल, कामगार

Web Title: Business losses machine loom currency ban