बेळगावात यंत्रमाग व्यवसायाला घरघर ; कुटुंबाची होतीये उपासमार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

राज्य सरकारकडून अद्यापही विणकरांच्या कुटुंबीयांसाठी भरीव मदत मिळालेली नाही.

बेळगाव : कोविडमुळे नऊ महिन्यांपासून यंत्रमाग व्यवसायाला घरघर लागली आहे. गेल्या मार्चपासून यंत्रमागांची धडधड अक्षरशः मंदावली आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या बेळगाव शहरासह जिल्ह्यातील हजारो विणकर कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून अद्यापही विणकरांच्या कुटुंबीयांसाठी भरीव मदत मिळालेली नाही. त्यामुळे सरकारकडून विणकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम झाले आहे.

गेल्या मार्चपासून कोरोनाचा फैलाव सुरू झाल्याने अन्य व्यवसायांप्रमाणे या उद्योगावरही विपरीत परिणाम झाले. येथील उत्पादित साड्यांची विक्री थांबल्याने यंत्रमाग बंद ठेवावे लागले. यामुळे या व्यवसायावर अवलंबून हजारो विणकर कुटुंबीयांना रस्त्यावर येण्याची वेळ आली. उपजीविकेसाठी असंख्य विणकर बांधवांनी रस्त्याशेजारी भाजी आणि फळेविक्री सुरू केली. काहींनी मिळेल ती कामे सुरु ठेवली. नऊ महिन्यांपासून यंत्रमागांची धडधड मंदावली होती. दसऱ्यापासून काही प्रमाणात या उद्योगाला संजीवनी मिळाली आहे. यामुळे दिवाळीत विणकरांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

हेही वाचा - बेळगावात टीईटीत 2 लाख परीक्षार्थींपैकी फक्त 8 हजार पास

असंख्य विणकर कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी अन्य जिल्ह्यांतून बेळगावच्या उपनगरात राहण्यासाठी आले आहेत. भाडोत्री घरात त्यांचे वास्तव्य आहे. मात्र अनेक महिने काम नसल्याने तसेच वेतन न मिळाल्याने घराचे भाडे भरणेही कठीण बनले आहे. एकीकडे कोरोनाशी सामना करत असतानाच विणकर बांधवांना बेरोजगार व्हावे लागले आहे. दिवाळीपासून काही प्रमाणात यंत्रमाग व्यवसाय सुरु झाल्याने विणकर बांधवांतून समाधान व्यक्त होत आहे. सरकारकडून विणकर बांधवांना घोषित केलेला दोन हजारांचा मदतनिधी अद्यापही दिला नाही. विणकर संघटनांनी मदत मिळवून देण्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न सुरु ठेवले आहेत.

"राज्य सरकारच्या विणकरविरोधी धोरणाविरोधात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोड्डबळ्ळापूर येथे २८ रोजी राज्यातील विणकरांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत पुढील धोरण स्पष्ट होईल. विणकरांना सरकारकडून मिळणारे अनुदान तसेच आत्महत्या केलेल्या विणकर कुटुंबीयांना भरपाई मिळावी, यासाठी संघटनेतर्फे मुख्यमंत्री, वस्त्रोद्योगमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत."

- परशुराम ढगे, विणकर संघटना नेते

हेही वाचा -  ....आणि मामाचे गावही गहिवरले! -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the business of weaver in belgaum stopped during march 2020 cause corona families also face problems for survive