उद्योगपती दानचंद घोडावत यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 एप्रिल 2019

एक नजर

  • जयसिंगपूर येथील प्रथितयश उद्योगपती दानचंद खिवराज घोडावत (वय ८४) यांचे निधन. 
  • आज (ता. २८) सकाळी अंत्ययात्रा
  • उदगाव वैकुंठधाम स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार.
  • सोमवारी (ता. २९) सकाळी साडेदहा वाजता वाजता मनाली गार्डन येथे स्मृतीसभेचे आयोजन

 

जयसिंगपूर - येथील प्रथितयश उद्योगपती दानचंद खिवराज घोडावत (वय ८४) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. आज (ता. २८) सकाळी अंत्ययात्रा निघणार आहे. उदगाव वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सोमवारी (ता. २९) सकाळी साडेदहा वाजता वाजता मनाली गार्डन येथे स्मृतीसभेचे आयोजन केले आहे.

संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, उद्योगपती संजय घोडावत, उद्योगपती विनोद घोडावत, सतीश घोडावत यांचे ते वडील होत. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करून सामाजिक भानही जपले आहे.

दानचंद घोडावत यांचा जिज्ञासू, प्रांजल स्वभाव होता. कौटुंबिक जबाबदारी पेलत त्यांनी उद्योग विश्वात स्वतंत्र वलय निर्माण केले. कष्ट, संघर्ष आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी उद्योग व्यवसायात मोठे कार्य केले. धैर्याने प्रत्येक परिस्थितीला सामोरे जात ग्रुपचे आधारस्तंभ ठरले. शुद्ध, सात्विक व सुसंस्कृतपणा त्यांनी आचार विचारांमध्ये जपला. सहृदयता, शिस्तप्रियता, न्यायनिष्ठ, कल्पकता ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती.

व्यावसायिक अभिवृत्तीबरोबरच त्यांनी सामाजिक कार्याचा वसा हाती घेऊन कित्येक उपेक्षितांना मदत करून आपल्या दातृत्व गुणांचे दर्शन घडविले आहे. अंधांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी त्यांनी मरणोत्तर नेत्रदान ही केले आहे. उद्योग विश्‍वात लौकिक मिळवूनही त्यांनी सर्वसामान्यांमध्ये समरस होण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात ते धावून जात होते. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Businessman Danchand Ghodavat passed away