क्षयरुग्णांना उद्योजकाकडून संतुलित आहाराचा पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - जिल्ह्यातील गंभीर क्षयरुग्णांना जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटी मोफत औषध देते; मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना औषधांसोबत संतुलित व प्रथिनेयुक्त आहार घेता येत नाही. परिणामी अशा रुग्णांना आहारासाठी मदतीबाबतचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत उद्योजक सुधीर पाटील (सिद्धनेर्ली, ता. कागल) यांनी 95 आहार पाकिटे अशा क्षयरुग्णांसाठी दिली.

श्री. पाटील यांच्या मदतीतून शंभर रुग्णांची महिन्याभराची सोय झाली; पण तिथून पुढेही मदत लागेल. त्यामुळे अन्य दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, उद्योजकांनी पुढाकार घेतल्यास गंभीर क्षयरोगीला मदत होणार आहे.
औषधे व संतुलित आहार घेऊन अनेक रुग्ण बरे होतात; पण काहीजण थोडे बरे वाटले, की औषधे अर्धवट सोडतात. तेव्हा कालांतराने क्षयरोग पुन्हा बळवतो. दोन-तीन वेळा औषधाचा कोर्स अर्धवट सोडला की क्षयरोग गंभीर रूप धारण करतो. क्षयरोग नियंत्रण सोसायटी गंभीर क्षयरोगींना मोफत औषधे देते; पण प्रश्‍न संतुलित व प्रथिनयुक्त आहाराचा होता. याबाबत "सकाळ'मधील बातमी वाचून श्री. पाटील यांनी क्षयरोग नियंत्रण सोसायटीशी संपर्क साधून प्रथिनेयुक्त संतुलित आहाराचे 95 डबे सोसायटीकडे दिले.

क्षयरोग डॉटस उपचाराने बरा होतो; मात्र गंभीर स्वरूपातील क्षयरोग बरा होण्यास दोन वर्षे औषधे घ्यावी लागतात. त्यासोबत संतुलित व प्रथिनेयुक्त आहार गरजेचा आहे. त्यासाठी जिल्हा क्षयरोग निवारण समितीने विविध संस्था, संघटनांशी संपर्क केला. दैनिक "सकाळ'ने दखल घेऊन वृत्त प्रसिद्ध केल्याने शंभर रुग्णांच्या आहाराची सोय झाली. असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच झाला. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी यांनी उपक्रमाचे कौतुक केले. अशा मदतीतून जिल्हा क्षयमुक्त होण्यास मदत होईल.
- डॉ. हर्षदा वेदक, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी

Web Title: businessman food suppy to te patient