कोल्हापूरातील ‘सीबीएस’ होणार आता बसपोर्ट

शिवाजी यादव
रविवार, 19 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील १४ बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा समावेश आहे.

कोल्हापूर - विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील १४ बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा समावेश आहे. सीबीएसचे रूपांतरही बसपोर्टमध्ये होणार आहे. ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर ३० वर्षांसाठी हा करार होणार आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यासाठी आराखडा बनविण्यात येत असून, नव्या सुविधांमुळे बस स्थानकांचा लूक हायटेक होणार आहे.

राज्यातील एस.टी. महामंडळाच्या बस स्थानकांवर पारंपरिक पद्धतीने बांधलेली बस स्थानके आहेत. अनेक बस स्थानकांवर खरखरणारा ध्वनिक्षेपक, काही ठिकाणी इलेक्‍ट्रॉनिक्‍स अनाऊसमेंट, तर वेळापत्रकांचा फलक जुना झालेला आहे. चौकशी कक्षासमोर गोंगाट असतो. अनेक ठिकाणी कॅन्टीनची गलिच्छ सेवा मिळते. 

अशा विविध कारणाने राज्यातील बस स्थानकांना अडगळीची अवकळा आली आहे. रोज हजारोंच्या संख्येने प्रवासी व शेकडो बसगाड्यांची ये-जा होते. 

अशा बस स्थानकांचे अडगळीचे चित्र बदलले जावे, तसेच प्रवाशांना अधुनिक सोयीसुविधा मिळाव्यात, आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये होणार आहे. 

नव्या बसपोर्टमध्ये असे असेल

  • जागेचे मूल्यांकन करून सुविधांचा आराखडा 
  • अंदाजित खर्च ३२५ कोटी रुपये  
  • मोठा कॉम्प्लेक्‍स उभारला जाईल
  • बस स्थानकावर आरामदायी खुर्च्या 
  • गाड्यांची माहिती देणारा डिजिटल स्क्रिन असेल
  • बसल्या जागेवर प्रवाशांना गाड्यांची माहिती मिळेल 
  • आधुनिक चौकशी कक्ष 
  • मिनी थिएटर व्यवस्था
  • मुक्कामासाठी निवासी व्यवस्था 
  • सुसज्ज कॅन्टीन सेवा

 
‘बीओटी’वरील प्रकल्प 
कोल्हापूर बस स्थानकाला राजाराम महाराजांनी जागा दिली. ही जागा एस.टी. महामंडळाला लीजवर दिली आहे. त्याची मुदत २०५६ पर्यंत आहे. तेवढ्या कालावधीसाठी ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर खासगी कंपनीला बसपोर्टचे काम देण्यात येईल.

सध्या बसस्थानक
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाच्या एकूण सहा एकर जागेत सध्या एस.टी. आगार, बसस्थानक, यंत्र कार्यशाळा आहे. सुमारे २४ फलाट आहेत. येथे कोकणकडे जाणाऱ्या गाड्या, मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या, तसेच सोलापूर, मराठवाड्याकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी स्वतंत्र फलाट व्यवस्था आहे. 

Web Title: Busport on CBS Kolhapur