चौरंगीनाथाच्या डोंगरावर फुलपाखरांची भरली शाळा !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

पलूस - जिल्ह्यातील कडेगाव शहरापासून दक्षिणेला सुमारे १५ किलोमीटर अंतरावर वसलेल्या सोनसळ गावच्या पश्‍चिमेला चौरंगीनाथाचा डोंगर आहे. सध्या या डोंगराने हिरवाईचा शालू नेसलाय. सध्या हा डोंगर रंगीबेरंगी फुलपाखरांनी सजला आहे. वन्यप्राणी, पक्षिमित्र व वनअभ्यासकांसाठी ही संधी आहे.

स्वच्छंदीपणे विहार करणारी ही छोटी-छोटी फुलपाखरे लहानांपासून मोठ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या प्रत्येक जातीच्या फुलपाखराला विशिष्ट प्रकारचीच झाडं आवडतात. ही फुलपाखरे यातील काही वनस्पतींवर उपजीविका, तर काही वनस्पती प्रजननासाठी निवडल्याचे पाहायला मिळते. 

या फुलपाखरांच्या काही जातींचे अंडी, आळी, कोश, असे हे अवस्थांतर सध्या सुरू आहे. या फुलपाखरांचे नर डोंगरमाथ्याला उंच ठिकाणी थांबून या परिसरात फिरणाऱ्या मादींची टेहळणी करताना दिसत आहेत. 

आपल्याच प्रकरातील मादी शोधत असून त्यांच्या शरीरावरील संप्रेरकाच्या वासावरून ही निवड होते. त्यानंतर सुरू होतो या नरमादीचा पाठशिवणीचा खेळ. या खेळात नर मादीला मिलनासाठी मनवतो. या मिलनाचा कालावधी एक तास ते चोवीस तासांचा असू शकतो.   

‘‘कॉमन टायगर, ब्लू टायगर, ग्रेट इगफ्लाई, डॅंनीड इगफ्लाई, टोनी कोस्टर, कॉमन अल्बेट्रास अशा अनेक प्रकारच्या फुलपाखरे सध्या दिसत आहेत. अन्नसाखळीत फुलपाखरांची भूमिका महत्त्वाची आहे. हे निसर्गचक्र विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी शिक्षकांनी चौरंगीनाथला जरूर वर्षा सहली आयोजित कराव्यात.’’
- संदीप नाझरे,
आमणापूर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Butterfly school on Chouranginath hill in Sangli