सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

- 15 हजार अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रणा पुरविणार
- अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली माहिती

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून 15 हजार अतिरिक्त मनुष्यबळ व अतिरिक्त मतदान यंत्रे उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसभेच्या मतदानसाठी 15 हजार कर्मचाऱ्यांची अतिरिक्त गरज भासणार आहे. तसेच पोटनिवडणुकीसाठी 3500 बॅलेट युनिट (बीयू), 3000 कंट्रोल युनिट (सीयू) व 3200 व्हीव्हीपॅट हे जास्तीचे लागणार असून ही सर्व यंत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले, सातारामध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्रच होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे दोन संच राहतील. यामध्ये लोकसभेसाठी असणाऱ्या मतदान यंत्रावर पांढऱ्या रंगाचे स्टिकर लावण्यात येणार असून विधानसभेसाठी असणाऱ्या यंत्रावर गुलाबी रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांची गफलत होणार नाही. तसेच मतदान यंत्रावरील मतपत्रिकेचा रंगही याप्रमाणेच राहणार असून यंत्रावर मोठ्या अक्षरात लोकसभा व विधानसभा असे नमूद करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर एकच मतदार नोंदणी पुस्तिका ठेवण्यात येणार आहे. परंतु विधानसभा व लोकसभेसाठी दोन वेगवेगळ्या मतदार स्लिप असणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bypoll to Satara Lok Sabha seat on October 21