सोशल मीडियावर प्रचाराचे धुमशान 

प्रकाश भालकर - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

कुरळप - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रचारसभा, वैयक्तिक गाठीभेटी, बैठका या बरोबरच सोशल मीडियावरही प्रचाराचे रान उठले आहे. फेसबुक, व्हॉट्‌सऍप, मोबाईलवरील ध्वनी व चित्रफिती यावर सध्या प्रचाराचे धुमशान सुरू आहे. 

कुरळप - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रचारसभा, वैयक्तिक गाठीभेटी, बैठका या बरोबरच सोशल मीडियावरही प्रचाराचे रान उठले आहे. फेसबुक, व्हॉट्‌सऍप, मोबाईलवरील ध्वनी व चित्रफिती यावर सध्या प्रचाराचे धुमशान सुरू आहे. 

निवडणुकीची तारीख जवळ येईल तसे वातावरण अधिकच तापू लागले आहे. उमेदवार स्वतःचे कार्यकर्ते घेऊन रानोमाळ फिरत आहेत. मुख्य पार्टीप्रमुख गावागावांतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका घेऊन निवडणुकीची व्यूहरचना आखत आहेत. गुप्तबैठका, प्रचारसभा, पारावरच्या गप्पा यांनी रंगत येत आहेत. उमेदवाराच्या बाजूने आणि विरोधकाच्या बाजूनेही पैजा लागल्या आहेत. या सर्व घडामोडीत सोशल मीडियावरील प्रचार आघाडीवर आहे. फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवरून दादा, आबा, बाबा, अण्णा, तात्या अशा नावांनी उमेदवार घराघरांत पोहोचवले जात आहेत. "गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच आहे',"वाघ एकटाच येतो', "ठासून येणार', "राडा तर होणारच', " आता बदल हवाच', "जिकडं भेळ तिकडं खेळ', "पर्दाफाश घराणेशाहीचा', "लढायचं स्वबळावर जिंकायचंही स्वबळावर' अशा सूचक वाक्‍यांचा आधार घेत उमेदवारांचा डिजिटल प्रचार सुरू आहे. 

व्हॉट्‌सऍपवरील ग्रुपमध्ये विविध पक्षांतील कार्यकर्ते एकत्र असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलवर सर्वच नेते, उमेदवार यांचा प्रचार पोहोचला आहे. अशी जाहिरातबाजी करणाऱ्या समर्थकाला तिकडून एखादी जाहिरात पडल्याचे दिसताच इकडून त्याच्यावर कडी करणारी दुसरी जाहिरात पडते. मग पुन्हा तिकडून, पुन्हा इकडून असे प्रचारयुद्ध सुरू आहे. यात सर्वसामान्य जनतेची चांगलीच करमणूक होत आहेत. 

आकर्षक गीत- संगीत 
उमेदवाराने यापूर्वी केलेली विकासकामे, नवख्या उमेदावाराचे सामाजिक काम आकर्षक गीत-संगीताच्या आधारे तयार केलेल्या चित्रफितीही मोबाईलवर फिरत आहेत. त्या निमित्ताने अशा जाहिराती, ध्वनिफिती व चित्रफिती तयार करणाऱ्या तंत्रज्ञांना रोजगार मिळाला आहे. फेसबुकच्या भिंतीही प्रचाराच्या रंगात रंगल्या आहेत. केलेली विकासकामे आणि मतदानाचे आवाहन असे जाहिरातीचे स्वरूप आहे. एकूणच सोशल मीडियावरील प्रचारानेही ग्रामीण भागात निवडणुकीचे वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे. 

Web Title: Campaigning on social media