esakal | कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपचे गणित जुळणार का ?
sakal

बोलून बातमी शोधा

Can BJP Power Comes In Kolhapur ZP

जिल्हा परिषद सत्ता बदलासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीने आपल्या सदस्यांची बैठक घेत सत्ता बदलासाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपचे गणित जुळणार का ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर -  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीकडे राज्यात महाविकास आघाडी असल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी विविध कारणे देत सोयीस्कर पाठ फिरवल्याने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट विरोधाचीच भूमिका घेतल्याने जिल्हा परिषदेत भाजपची पुन्हा सत्ता आणताना मोठी दमछाक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बैठकीस शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील-सरूडकर यांनी दांडी मारली. त्यामुळे ही बैठक आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, हिंदूराव शेळके, माजी आमदार अमल महाडिक, समित कदम अशा मर्यादित नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. जनसुराज्यचे नेते आमदार विनय कोरे मुंबईत असल्याने ते बैठकीला उपस्थित नव्हते. 

हेही वाचा - ॲन्टीबायोटिक इंजेक्‍शनमुळे पाच विद्यार्थी अत्यवस्थ 

शिवसेनेच्या नेत्यांची बैठकीस दांडी

जिल्हा परिषद सत्ता बदलासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीने आपल्या सदस्यांची बैठक घेत सत्ता बदलासाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्‍वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील यांनी मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. शहराबाहेरील एका हॉटेलमध्ये ही बैठक झाली. जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येण्यात मित्र पक्षांचा सिंहाचा वाटा आहे. यात जनसुराज्य (६ सदस्य), शिवसेना (७ सदस्य), आवाडे व शेट्टी गट (प्रत्येकी २), चंदगड विकास आघाडी (२ जागा) यांचा समावेश आहे. आमदार पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीस सध्या सत्तेत असलेल्या सर्व मित्र पक्षांना निमंत्रण दिले होते; मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी विविध कारणे देत या बैठकीस दांडी मारली. चंद्रदीप नरके यांनी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीचे कारण दिले, सत्यजित पाटील यांनी ‘गोकुळ’च्या अनुषंगाने; तर  डॉ. सुजित मिणचेकर यांनी विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या भूमिकेवरून नाराज होत या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे सांगण्यात आले. स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी तर स्पष्टपणे भाजपसोबत जाण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा - VIDEO : शेणाने सारवलेल्या गाडीतून मुलीची पाठवणी; हेतू काय ? जरूर वाचा 

चंद्रकांत पाटील आता काय खेळी खेळणार?

भाजपच्या बैठकीतील घडामोडींमुळे सत्ता स्थापनेत किती अडचण येणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. जोपर्यंत मित्र पक्षांची नाराजी दूर होत नाही, तोपर्यंत भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न साकार होण्यात अडचणी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मित्रांची नाराजी दूर करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील आता काय खेळी खेळणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

स्वाभिमानीचा नकार
भाजपच्या ध्येय-धोरणांना आमचा विरोध आहे. जिल्हा परिषदेत त्यांना अडीच वर्षांसाठी पाठिंबा दिला होता. तो शब्द पाळण्यात आला आहे; मात्र येथून पुढे त्यांच्यासोबत जाण्याचा काही प्रश्‍नच नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजपसोबत राहणार नाही. 
- राजू शेट्टी, माजी खासदार

भाजपकडून बैठकीसाठी फोन

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. राज्याच्या राजकारणातही अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे आमचे सहकारी आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल. जो काही निर्णय होईल तो सर्वजण मिळून एकत्रितरीत्या घेतील. यासाठी लवकरच बैठक होणार आहे. दरम्यान भाजपकडून बैठकीसाठी फोन आला होता; मात्र संचालक मंडळाची बैठक असल्याने भाजपच्या बैठकीला जाता आले नाही. 
-चंद्रदीप नरके, माजी आमदार

loading image