माझा ट्रक पेटवून उसाला दर मिळणार का?

माझा ट्रक पेटवून उसाला दर मिळणार का?
माझा ट्रक पेटवून उसाला दर मिळणार का?

कोल्हापूर - उसाला चार हजार रुपये दर मिळाला तरी हरकत नाही. उसाच्या प्रश्‍नावर कोणाचं काय राजकारण चाललंय याच्याशीही आमचा संबंध नाही; पण माझ्या पोटापाण्याचा आधार असलेला माझा ट्रक पेटवून देऊन उसाला दर मिळणार आहे का सांगा?, असा उद्विग्न सवाल करत कल्लेश्‍वर वाघमोडे हा ट्रकमालक सैरभैर झाला आहे. त्याचा ट्रक गेल्या गुरुवारी नरंदे गावाजवळ पेटवून दिला. उसाची पहिली उचल ठरली नसताना ऊस वाहतूक करायचे धाडस का केले असा दम देत त्याचा ट्रक पेटवला गेला. हे नुकसान कसे भरून काढायचे हा त्याच्यासमोरचा प्रश्‍न आहे. उद्या तो थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या दारातच जाऊन बसणार आहे. ज्यांनी माझ्या पोटापाण्याचा आधार असलेला ट्रक पेटवला त्यांना पकडून आणा. त्यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा, अशी त्याची कळकळीची विनंती आहे.


ट्रक पेटवून देऊन आठवडा उलटला तरी चौकशीला एक नेता, एक अधिकारी फिरकत नाही याबद्दल तर तो अस्वस्थ आहे. एका कष्टकरी माणाचा ट्रक भरदिवसा गुंडा स्टाइलने पेटवला जातो. ड्रायव्हरला मारहाण केली जाते, त्याला मोटारसायकलवर बसवून लांब अंतरावर सोडले जाते याबद्दल कोणालाच का काही वाटत नाही? असे एकामागून एक प्रश्‍न तो जो भेटेल त्याला विचारतो. अर्थात त्याच्या या प्रश्‍नाने समोरचा अनुत्तरीत होऊन जातो.


कल्लेश्‍वर वाघमोडे यांचे दोन ट्रक आहेत. ते त्यांनी ऊस वाहतुकीसाठी लावले आहेत. त्याच्यावर कर्जाचा बोजा आहे. त्यांनी वारणा साखर कारखान्याला ऊस घालण्यासाठी ट्रकमध्ये ऊस भरला. नरंदेच्या जवळ पोलिस ज्या पद्धतीने ट्रक बाजूला घ्यायला लावतात त्या पद्धतीने एका व्यक्तीने त्याचा ट्रक थांबवला. पोलिसानेच ट्रक थांबवायचा इशारा दिला असे समजून केराप्पा कोरे या ड्रायव्हरने ट्रक बाजूला घेतला. ट्रक थांबताच तोंडाला रुमाल बांधलेले चौघे-पाच जण आले. त्यांनी ड्रायव्हरला खाली ओढले. दोघांनी ट्रकच्या टायरवर अणकुचीदार हत्त्याराने वार केले. दोघांनी रॉकेलचे कॅन केबिन व टायरवर ओतले व ट्रकला पेटवून दिले. एका मोटारसायकलवर बसून ड्रायव्हरला लांब अंतरावर सोडून दिले. बघता बघता ट्रकने बेट घेतला व निम्मा ट्रक जळून खाक झाला.

वाघमोडेचे मनस्वास्थ्यच बिघडले
घटनेने कल्लेश्‍वर वाघमोडे अक्षरशः हादरून गेले. त्यांचे मनस्वास्थ्यच बिघडले. आता त्यांचा प्रत्येकाला फक्त एकच सवाल आहे. माझा ट्रक पेटवून उसाला दर मिळणार आहे का? आज त्यांनी ट्रकमालक-चालकांची संघटना असलेल्या लॉरी ऑपरेटर्स असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. आपला ट्रक पेटवून दिल्याच्या घटनेने सैरभेर झालेल्या वाघमोडेंची समजूत घालणे पदाधिकाऱ्यांनाही काही काळ अशक्‍य झाले. त्यामुळे आता उद्या थेट जिल्हा पोलिसप्रमुखांनाच सर्व जण भेटणार आहेत व आंदोलनात इतरांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये, अशी मागणी करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com