अडत व्यापारी, दलालांचे परवाने रद्द करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

शेतकरी संघटनेची मागणी; सातारा बाजार समितीच्या आवारात तणावाचे वातावरण
सातारा - भाजीपाला विक्री नियंत्रणमुक्तीमुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्याची मुभा मिळाली आहे; पण या धोरणास विरोध करून संप करणाऱ्या अडते व्यापारी, दलाल यांचे परवाने रद्द करून त्यांच्याकडील बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकरी संघटनेची मागणी; सातारा बाजार समितीच्या आवारात तणावाचे वातावरण
सातारा - भाजीपाला विक्री नियंत्रणमुक्तीमुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्याची मुभा मिळाली आहे; पण या धोरणास विरोध करून संप करणाऱ्या अडते व्यापारी, दलाल यांचे परवाने रद्द करून त्यांच्याकडील बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, बाजार समिती आवारात अडते व्यापाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यामुळे तेथे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भगत, जिल्हा संघटक श्रीकांत लावंड, ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख व जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की युतीच्या सरकारने शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्री नियंत्रणमुक्त करण्याचा सुधारित कायदा मंजूर केला. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; पण या निर्णयास विरोध म्हणून भाजीपाला खरेदी- विक्री बंद ठेऊन शेतकऱ्यांना व ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या दलाल व्यापाऱ्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना निषेध करत आहे. दलाल व्यवस्था हे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येमागचे एक कारण आहे. अडत व्यापारी हा शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीवर परिणाम करणारा घटक आहे. त्यामुळे भाजीपाला विक्री नियंत्रणमुक्त धोरण विरोध करणाऱ्या व बंद मागे न घेणारे व्यापारी, दलाल, अडते यांचे परवाने शासनाने रद्द करावेत, तसेच त्यांची बेहिशोबी मालमत्तेची चौकशी लावावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, बाजार समितीच्या आवारात जाऊन अडत व्यापाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहनाचा प्रयत्न करणाऱ्या स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांनी पुतळा हिसकावून घेतला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होऊन पोलिस व स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादीचा प्रकार झाला.

या वेळी संजय साबळे, सचिन नलवडे, देवानंद पाटील, रंगराव घोरपडे, ज्ञानेश्‍वर कदम, राजू बर्गे, ज्ञानेश्‍वर जाधव, नारायण शिंदे, तानाजी जगताप, राजू शेळके, विक्रम साळुंखे, कृष्णात क्षीरसागर, भाऊसाहेब माने, बापूसाहेब साळुंखे, हेमंत पाटील, बी. जी. साबळे, सतीश लावंड आदीसंह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Cancel commision trade, brokers licenses