esakal | 90 यात्रा रद्द झाल्या, अन झाली 22 कोटींची बचत 
sakal

बोलून बातमी शोधा

canceled 90 festivals saves 22 crores

वाळवा तालुक्‍यातील 90 हुन अधिक गावांत यात्रा रद्द झाल्या. यात्रा रद्द झाल्यामुळे हिरमोड झाला तरी आर्थिक बचत झाल्यामुळे घराघरांतील कारभाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. यात्रांवर होणारा खर्च विचारात घेता तालुक्‍यातील रद्द यात्रांमुळे सुमारे 22 कोटींची बचत झाली. 

90 यात्रा रद्द झाल्या, अन झाली 22 कोटींची बचत 

sakal_logo
By
दीपक पवार

इटकरे : वर्षभरात एकदा येणारा यात्रा-जत्रांचा उत्सव साजरा करण्याच्या जोशात असणारी वाळवा तालुक्‍यातील जनता "कोरोना'च्या शिरकाव्याने हिरमुसली. कोट्यवधीच्या बचतीची दुसरी बाजूही विचार करायला लावणारी आहे. वाळवा तालुक्‍यातील (जि. सांगली) 90 हुन अधिक गावांत यात्रा रद्द झाल्या. यात्रा रद्द झाल्यामुळे हिरमोड झाला तरी आर्थिक बचत झाल्यामुळे घराघरांतील कारभाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. यात्रांवर होणारा खर्च विचारात घेता वाळवा तालुक्‍यातील रद्द यात्रांमुळे सुमारे 22 कोटींची बचत झाली. एप्रिलपासून उर्वरीत गावांच्या यात्रांना सुरुवात होते. अगदी एक-दोन दिवसांच्या फरकाने गावागावांत ग्रामदेवतांच्या यात्रा होतात. लॉकडाऊनमुळे 90 हुन अधिक गावांतील यात्रा रद्द झाल्यात. 

यात्रा म्हटलं, की अबालवृध्दांच्या उत्साहाला उधाण येते. साधारण पाच हजार लोकसंख्येच्या गावात तब्बल साडे तीन टन मटणाचा फडशा पडतो. खेळणी, मनोरंजनाचे खेळ, हार, फुले, नारळ, चिरमुरे, विविध खाद्य पदार्थ, मुलांना नवीन कपडे यावरही घर कारभाऱ्याला खर्च करावा लागतो. परिस्थिती नसतानाही अनेकजण हातउसने किंवा कर्ज घेऊन यात्रा करतात. सध्या कोरोनाने यात्रा थांबल्या आहेत. मुलांच्या चेहऱ्यावरील उत्साह मावळला आहे. यात्रांचा ताजा, शिळा दिवस निरुत्साहात सरला. आता मात्र यात्रा झाली असती तर किती खर्च झाले असते, ते वाचले या विचाराने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. 

यात्रा त्या त्या गावच्या सांस्कृतिक संचित मानल्या जातात. ग्रामदैवतांच्या यात्रा म्हणून भावनिक नजरेने त्याकडे पाहिले जाते. यात्रेदिवशी मंदिरात होणाऱ्या पूजादेखील सोशल डिस्टिंगचे नियम पाळून पूर्ण केल्या जाताहेत. मात्र मंदिराबाहेर भरणारी यात्रा थांबल्याने निरुत्साहाच्या एका बाजूला मोठी आर्थिक बचत झाल्याची दुसरी दिलासादायक बाबसुध्दा विचार करायला लावणारी आहे. 

98 गावे, शेकडो यात्रा 

वाळवा तालुक्‍यात इस्लामपूर व आष्टा या दोन शहरांसह 98 गावे आहेत. आष्ट्याच्या भावईपासून तालुक्‍यातील यात्रांचा हंगाम सुरु होतो. आष्ट्यानंतर नेर्ले व अन्य गावांत भावईची यात्रा भरते. दिवाळीत बोरगावची यात्रा तर कार्तिक पौर्णिमेला इस्लामपूरचा ऊरुस भरतो. त्यानंतर महाशिवरात्रीला गोटखिंडी, नंतर सुरुल, ओझर्डे, पेठ गावांच्या यात्रा यावर्षी उत्साहात झाल्या.

loading image