
मार्चमध्ये यादवनगर येथील मुल्ला यांच्या घराशेजारी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर तत्कालीन प्रशिक्षणार्थी अप्पर पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी कारवाई केली. या कारवाईवेळी मुल्लासह जमावाने शर्मा यांना धक्काबुक्की केली होती.
कोल्हापूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका व "मोका' अंतर्गत कारवाई झालेल्या शमा मुल्ला यांचे नगरसेवक पद अखेर रद्द झाले आहे. महापालिकेच्या सलग सहा सर्वसाधारण सभेला एखादा सदस्य सातत्याने गैरहजर राहत असेल तर त्याच्यावर अशा प्रकारची कारवाई होते.
मार्चमध्ये यादवनगर येथील मुल्ला यांच्या घराशेजारी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर तत्कालीन प्रशिक्षणार्थी अप्पर पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी कारवाई केली. या कारवाईवेळी मुल्लासह जमावाने शर्मा यांना धक्काबुक्की केली होती. वरिष्ठ महिला अधिकाऱ्यालाच धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने याची गंभीर दखल पोलिस दलाकडून घेतली गेली. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच अवैध व्यावसायिकांवर मोका अंतर्गत कारवाईचा धडाका सुरू केला. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या व याआधीही मटक्याचे गुन्हे दाखल असलेल्या सलीम मुल्लासह शमा मुल्ला व इतर 44 जणांवर "मोका' अंतर्गत कारवाई झाली. या कारवाईनंतर शमा मुल्ला या कळंबा कारागृहात आहेत. त्यामुळे सहा महिन्यांपासून त्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिल्या नव्हत्या.
नगरसेवकाचे पद रद्द होण्याची ही पहिलीच वेळ
नुकत्याच झालेल्या सभेवेळी त्यांना पोलिस बंदोबस्तात हजर करण्यात आले. मात्र, तांत्रिक कारणामुळे उशिरा आल्याने या सभेलाही त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. आजच्या कारवाईमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ एकने कमी होऊन 13 इतके झाले आहे. शमा मुल्ला यांनी उपमहापौर पदही भूषविले आहे. मोकाअंतर्गत कारवाई झाली असताना नगरसेवकाचे पद रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलिसांनी मटका तसेच अवैध व्यवसायावरील ठोस कारवाई सुरू केली आहे.