जुन्या पेन्शनसाठी कँडल मार्च

जुन्या पेन्शनसाठी कँडल मार्च

सोलापूर : राज्यात एक नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी आज सोलापुरात कँडल मार्च काढण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चार पुतळ्यापासून सुरू झालेला हा कँडल मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यामध्ये वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. 

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या घुमजावचा निषेध करण्यासाठी यावेळी 'जवाब दो'चा नारा देण्यात आला. त्याचबरोबर आज दिवसभर जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने आजवर अनेक राज्यव्यापी आंदोलने केली आहेत. नुकतेच दोन व तीन ऑक्‍टोबरला मुंबईला पेन्शन दिंडीचे आयोजन केले होते. त्यावेळी सरकारने 16 ऑक्‍टोबरला चर्चेला बोलावले होते. त्यानुसार राज्याचे मुख्य वित्तसचिव यांच्यासोबत संघटनेच्या शिष्टमंडळाने दोन दिवस चर्चा करून नवीन पेन्शन कशी अन्यायकारक आहे हे पटवून दिले. यावर वित्तसचिव यांनी जुनी पेन्शनबाबतचा निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळासमोर विषय येणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. 

जुनी पेन्शनचा विषय मंत्रिमंडळासमोर घेणार का? जुनी पेन्शन योजना कधी लागू करणार? याचा जाब विचारण्यासाठी आज कँडल मार्च काढण्यात आला. कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या नवीन पेन्शन योजनेला आज 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, आश्रमशाळा, महसूल, जिल्हा परिषद कर्मचारी, आयटीआय, नगरपालिका, महानगरपालिका, तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले व सायंकाळी कॅंडल मार्चही काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com