सोशल मीडियावर रंगलंय वाक्‌युद्ध !

सोशल मीडियावर रंगलंय वाक्‌युद्ध !

सातारा : कर्तृत्व आणि वक्तृत्व यांची साथ असेल तर निवडणुकीचे मैदान सहजपणे मारता येते, असे म्हटले जाते. आपला उद्देश मतदारांच्या मनात नेमकेपणाने उतरवता आला तर मताचे दान पदरात पाडून घेता येते, हेही खरे आहे. बदलत्या काळात निवडणुकीचे प्रचारतंत्र बदलले आहे. सोशल मीडियाचा वापर सर्रासपणे होत आहे. नेत्यांच्या नावे व्हॉट्‌सपऍप ग्रुप, फेसबुक वॉल, इन्स्टाग्राम यांसारख्या माध्यमांचा वापर करताना ग्रुपच्या "डीपी'वर प्रेरणादायी वाक्‍ये लिहून मतदारांवर प्रभाव टाकला जात आहे. 

लोकशाहीमध्ये निवडणूक हे सुद्धा एक "युध्द'च आहे. तंत्रज्ञानाने या युध्दाची परिभाषा बदलली आहे. त्याचा परिणाम निवडणूक युध्दातही दिसून येतो. पूर्वी भिंती रंगवून, वृत्तपत्रातून आणि ध्वनिक्षेपकावरून प्रचार केला जायचा. आता सोशल मीडियावरून आपले मत ठसवले जात आहे. कमी शब्दात मोठा अर्थ साधणाऱ्या "टॅग लाइन' मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. "भुलवितात जे जनतेला, भरतो त्यांचा घडा, निवडणुकीच्या शाळेमध्ये जनताच शिकविते धडा', "परफेक्‍ट निर्णय घेणार... नंबरच दाबणार', "युवा मनाचा निर्धार नवा ... हवा आमदार नवा,' "एक लढा लोकहितासाठी आपल्या माणसांसाठी', "होय, परिवर्तन होणार', "घडणार सत्ता परिवर्तन आणि तो तुम्हीच घडविणार', "एकदा तुमच्या साथीने, "... मतदारसंघ बदलणार गतीने, आपला आमदार कार्य दमदार', "आपल्या उज्वल भविष्यासाठी साथ तुमची, "... मतदारसंघाच्या विकासासाठी कास माझी', "लक्ष्य विधानसभा' "होऊ बदलाचे साक्षीदार, "निवडूया आपला हक्काचा आमदार' यासारख्या दीर्घ ओळींतून आपले म्हणणे मतदारांपर्यंत पोचवण्याचे काम केले जात आहे.

एकदा वाचल्यानंतर या ओळी सहजपणे मनात रुजतात. वाचणाऱ्यांकडून त्याचा सतत पुनरुच्चार केला जातो. यासाठी खास लोकांचा वापर करून या ओळी तयार करून घेतल्या जात आहेत. 

त्याचबरोबर "मिशन ...', "जनतेसाठी काय पण', ".... करायलाच लागतंय' यांसारख्या मोजक्‍या शब्दातून व्यापक अर्थ साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या-त्या गटाचे समर्थक भेटल्यानंतर या "टॅगलाइन'चा उच्चार करताना दिसत आहेत. महाराष्ट्र विधानसभा इमारतीच्या फोटोच्या पार्श्‍वभूमीवर नेत्याचा हात जोडून किंवा हात उंचावून वापरलेला फोटो आणि त्याखाली किंवा वरच्या दिशेने कमानीच्या आकारात या ओळी वापरण्यात आल्या आहेत.

काहींनी तर निवडणुकीपूर्वीच आपल्या नेत्याला "आमदार' करून टाकलंय. प्रतिस्पर्ध्याला प्रत्युत्तर देणे, त्याला घायाळ करण्याचे काम व्हॉट्‌सऍपच्या डिपीवर जोरात रंगले आहे. प्रत्यक्ष मतदानापूर्वीची ही लढाई प्रभावाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्वच उमेदवार त्याचा वापर करताना दिसून येत आहेत. प्रचार गीतांनीही व्हॉट्‌सऍपवर जोर लावला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com