लक्ष वेधून घेताहेत 'फॅन थ्रोटेड सिटाणा' ! 

परशुराम कोकणे
रविवार, 13 मे 2018

सोलापूर परिसरातील माळरानावर सध्या फॅन थ्रोटेड सिटाणा दिसत आहेत. अतिशय सुंदर, मनमोहक असणारा हा सरडा भारतात सर्वत्र आढळतो.

सोलापूर : झाडांच्या फांदीवरून सरकन जाणारा, आवश्‍यकतेनुसार रंग बदलणारा सरडा तुम्ही पाहिलाच असेल..! मादीला आकर्षित करण्यासाठी गळ्याला पंखा काढून स्टाइल मारणारा 'फॅन थ्रोटेड सिटाणा' तुम्ही पाहिलाय का? सराड्याच्या जातीमधील, माळरानावर हालचाली असणारा फॅन थ्रोटेड सिटाणा 'वाइल्ड लाइफ फोटोग्राफर'चे लक्ष वेधून घेत आहे. 

सोलापूर परिसरातील माळरानावर सध्या फॅन थ्रोटेड सिटाणा दिसत आहेत. अतिशय सुंदर, मनमोहक असणारा हा सरडा भारतात सर्वत्र आढळतो. एप्रिलपासून पुढे पावसाळा सुरू होईपर्यंत त्याचे दर्शन होते. 8 इंच आकार असलेल्या या सरड्याचे 2016 पर्यंत फक्त एकच प्रकार आहे असे समजले जायचे. नंतर अभ्यासात याचे सिटाणा आणि सरडा असे दोन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले. सोलापुरात तीन प्रकार आढळतात.

पांढऱ्या रंगात आढळणारे दोन आहेत आणि निळा पंखा काढणारा एक आहे. आता प्रजनन काळ असल्याने मादीला आकर्षित करण्यासाठी नर हा गळ्याला पंखा (फॅन) काढतो. तसेच आपले अधिकार गाजवण्यासाठी तो फॅन काढत असतो. सकाळच्या वेळेस याच्या हालचाली जास्त असतात, असे वन्यजीव अभ्यासक शिवानंद हिरेमठ यांनी सांगितले. 

मागील पायावर उभा राहून लाल (भगवा) फॅन जास्त दाखवत असेल तर तो दुसऱ्या नराला आव्हान देतोय असे समजावे. निळा फॅन जास्त काढत असेल. तर मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय हे समजून घ्यावे. ज्याची फॅन मोठी मादी त्याच्याकडे आकर्षित होते.

पूर्ण फॅन फक्त काही सेकंदासाठी काढतो. रंगीत फॅनमध्ये निळा, काळा आणि लाल अशा तीन रंगांत याचा फॅन दिसतो. याचे खाद्य किडे मुंग्या आहे. शत्रूपासून धोका निर्माण झाला तर मेल्यासारखे निपचिप पडून राहतो. 

- शिवानंद हिरेमठ, वन्यजीव अभ्यासक

Web Title: Capturing the attention Fan Throwt Citana