.. अन्‌ बॅंकेसमोरील रांगेत घुसली कार ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

महिलांसह वीसजण जखमी

विजापूर रस्त्यावरील बॅंक ऑफ इंडियासमोरील घटना 

सोलापूर : पैसे काढण्यासाठी बॅंकेसमोर रांगेत थांबलेल्या वीसपेक्षा अधिक जणांना कारने उडविले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विजापूर रस्त्यावरील कोटणीसनगर येथील बॅंक ऑफ इंडियासमोर घडली. यापूर्वी कधीच कार न चालविलेल्या आणि मद्यप्राशन केलेल्या चालकाचा ताबा सुटल्याने हा थरार घडला. 

विजापूर रस्त्यावरील कोटणीसनगर येथे बॅंक ऑफ इंडियाची शाखा आहे. पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी रोजच्याप्रमाणे बॅंकेसमोर लांबपर्यंत रांग लागली होती. बॅंकेसमोरच परिवहन समितीचे माजी सभापती सुभाष चव्हाण यांचे घर आहे. त्या घरातून एक कार (एम.एच. 13 ए.सी. 4663) बाहेर आली. काही कळण्याच्या आत कार वेगाने बॅंकेसमोर थांबलेल्या गर्दीत घुसली. वीसपेक्षा अधिकजणांना कारने उडविले. रस्त्यावरून जाणारा भाजीवाला आणि इतरही लोकही जखमी झाले. कार काही अंतरावर पुढे जाऊन दुसऱ्या कारला (एम.एच. 13 ए.झेड. 0025) धडकली. जखमींना तातडीने जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. 

नागरिकांनी कारचालकाला बाहेर ओढून चांगला चोप दिला. घटनेची माहिती कळताच विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर आणि पोलिसांचे पथक दाखल झाले. नागरिकांनी चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेत सुदाम नामदेव काळे (वय 60, रा. कोटणीसनगर, विजापूर रोड, सोलापूर), जुही बाबूराव भंडारी (वय 19, रा. इंदिरा नगर, विजापूर रोड, सोलापूर), प्रेमसिंग अशोक राठोड (वय 25, रा. कमठेतांडा ता. दक्षिण सोलापूर), कविता विनोद जाधव (वय 30), सुमन विजय राठोड (वय 35, दोघी रा. प्रताप नगर, विजापूर रोड, सोलापूर), सुभाष जाधव (वय 48, यामिनी नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांच्यासह वीसजण जखमी झाले आहेत. 
 

Web Title: car accident in bank queue

फोटो गॅलरी