चालत्या गाडीच गर्भलिंग तपासणी करणाऱ्याना पकडले रंगेहात

सुदर्शन हांडे
मंगळवार, 17 जुलै 2018

बार्शी - मध्यरात्री चालत्या कारमध्ये गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. कारमध्ये गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा लावून रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. 

बार्शी - मध्यरात्री चालत्या कारमध्ये गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. कारमध्ये गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा लावून रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. 

या प्रकरणी कारमधील रूपेश विश्वास साळवे (वय २९ रा.सावळे चाळ, सोलापूर रोड, बार्शी), उमेश अरूण कदम (वय ३३ वर्षे रा.कदम वस्ती घाटणी, ता.माढा) व नंदकुमार स्वामी (रा.दत्तनगर, बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी कारसह, गर्भलिंगनिदानासाठी वापरण्यात आलेले साहित्य असा एकूण ५ लाख ८१ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. रविवार ता १५ रात्री ते सोमवार ता १६ रोजी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक संदीप जोरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दरम्यान, अटक केलेल्या साळवे व कदम यांना न्यायालयात उभे केले असता त्यांना १८ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

बार्शी शहर पोलिसांना यातील आरोपी रूपेश साळवे हा स्विफ्ट कारमध्ये (एम एच १३ बी.एन.०१०६) गर्भलिंग निदानाचे साहित्य घेवून गर्भलिंगनिदान करत असल्याचे तसेच तो बार्शी कुर्डूवाडी रस्त्यावर शहरानजीक असलेल्या जैन मंदिराजवळ गर्भलिंग निदान साहित्यासह थांबलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून पोलीसांनी सदरची कार थांबलेल्या ठिकाणी एका डमी महिलेस तपासणीकरिता पाठविले. सदर महिलेस कारमध्ये बसवून तिची तपासणी करत असतानाच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे, वैदयकीय अधिक्षक शीतल बोपलकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप जोरे यांच्यासह पोलीस पथकाने छापा टाकून रूपेश साळवे व उमेश कदम यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी सदर महिलेची गर्भलिंग तपासणी करत असल्याचे कबूल केले. तसेच वैदयकीय शिक्षणाची कसलीही कागदपत्रे नसल्याचे सांगून नंदकुमार स्वामी (रा.दत्तनगर, बार्शी) यांचे सांगणेनुसार एका महिलेचे गर्भलिंगनिदान चाचणी करिता २० हजार रूपये घेत असतो. व त्यातील १० हजार रूपये डॉ.स्वामी यांना देत असतो. तसेच सदरचे गर्भलिंगनिदानाचे साहित्य हे नंदकुमार स्वामी यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. 

कोणत्याही प्रकारचे विहीत वैदयकीय प्रमाणपत्र नसताना, मेडिकल बोर्डकडे प्रॅक्टीस करणेकरिता नोंदणी न करता शासनाने बंदी घातलेली असतानाही, बेकायदेशीर व अवैधरित्या गर्भलिंग निदान करण्याकरिताचे साहित्य बाळगले व गर्भलिंगनिदान करत असताना आढळून आले अशा आशयाची फिर्याद फौजदार जोरे यांनी दिली आहे. त्यावरून सदरच्या तिघांविरोधात पीसीपीएनडीटी अक्ट १९९४ चे कलम १, ७ अन्वये तसेच महाराष्ट्र वैदयक व्यवसाय अधि १९६१ चे कलम ३३ व भारतीय वैदयकीय परिषद अधि.१९५६ चे कलम १५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड करत आहेत.

Web Title: car was caught by police doing pregnancy test