युवकाकडून पिस्तूलासह काडतुसे जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयिताकडून देशी बनावटीच्या पिस्तूलासह दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.

कऱ्हाड -  पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयिताकडून देशी बनावटीच्या पिस्तूलासह दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. गस्त घालताना कोपर्डे हवेलीत या पथकाने संशयितास पकडले. धनंजय मारुती वाटकर (वय 21, विद्यानगर) असे त्याचे नाव आहे. जप्त केलेले पिस्तूल कोठून व कोणाकडून आणले, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी बेकायदेशीर पिस्तूल, हत्यारे बाळगणारांवर कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून काल (ता. 11) तालुक्‍यात गस्त घालण्यात येत होती. धनंजय वाटकर हा कोपर्डे हवेलीत मोटारसायकलसह संशयास्पदरित्या उभा असलेला पथकाला दिसला. वाटकर याच्यावर यापूर्वी पोलिसांत गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी त्याला पकडले. चौकशी करताना तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे बेकायदेशीर गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सापडली. पिस्तूल कोठून आणल्याबाबत वाटकरने उडवाउडवीची उत्तरे दिली. ओगलेवाडीतील मित्राने पिस्तूल दिल्याचे सांगितल्याने संबंधिताचे नाव पोलिसांनी निष्पन्न केले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून एक लाख 36 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. "स्थानिक गुन्हे'चे पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, हवालदार सुधीर बनकर, विजय कांबळे, प्रवीण फडतरे, शरद बेबले, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे, प्रमोद सावंत, विशाल पवार, विक्रम पिसाळ, संजय जाधव यांनी या कारवाईत भाग घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cartridges with pistol seized from the youth