चंदगडमध्ये चार गावठी पिस्तुलांसह मॅगझीन, काडतुसे जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

एक नजर

  • दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून चार गावठी पिस्तुलांसह पाच मॅगझीन व आठ जिवंत काडतुसे जप्त 
  • लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चंदगड येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या इचलकरंजी शाखेची कारवाई
  • विकी धोंडिबा नाईक (वय २८, रा. आमरोळी, ता. चंदगड) आणि सुनील भिकाजी घाटगे (२६, रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चंदगड येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या इचलकरंजी शाखेने दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून चार गावठी पिस्तुलांसह पाच मॅगझीन व आठ जिवंत काडतुसे जप्त केली.

विकी धोंडिबा नाईक (वय २८, रा. आमरोळी, ता. चंदगड) आणि सुनील भिकाजी घाटगे (२६, रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्यावर चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे.

याच अनुषंगाने तपास करताना चंदगड येथील बोंजुर्डी फाटा परिसरात दोन तरुण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. 
पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज तेथे पोलिसांनी सापळा रचून दोघा तरुणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे विकी नाईक व सुनील घाटगे असल्याचे सांगितले.

त्यांच्याकडून पोलिसांनी बेकायदा चार गावठी मॅगझीनसह पिस्तूल, एक स्वतंत्र मॅगझीन आणि आठ जिवंत काडतुसे असा दोन लाख सहा हजारांचा मुद्देमाल मिळून आला. तो त्यांनी जप्त केला. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना चंदगड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. पिस्तूल त्यांनी कोठून आणली? ती कोणी तयार केली? या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे? यापूर्वी या संशयितांनी आणखी कोणाला शस्त्रांची विक्री केली आहे का? याचा तपास पोलिस करीत आहेत. 

दोघे रेकॉर्डवरील 
ताब्यात घेतलेले दोघे संशयित रेकॉर्डवरील आहेत. त्यातील संशयित विकी नाईकवर २०१८ मध्ये गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात आर्म ॲक्‍टचा, तर संशयित सुनील घाटगेवर २०१३ मध्ये लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

कारवाईचे शिलेदार
इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक अमोल माळी, रणजित तिप्पे, सत्यराज घुले, कर्मचारी महेश कोरे, वैभव दड्‌डीकर, शहनाज कनवाडे, रणजित पाटील, विजय तळसकर, ज्ञानेश्‍वर बांगर, रविराज कोळी, राजू पट्टणकुडे, संजय इंगवले, फिरोज बेग, महेश खोत, रणजित पाटील, अजिंक्‍य घाटगे, संग्राम पाटील, सचिन बेंडखळे यांनी ही कारवाई केली. 

बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी संशयित दोघा जणांवर १२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात बंदुकांसह तलवारी, जांभिया अशी शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. अशी कारवाई पुढे सुरूच राहणार आहे. 
- डॉ. अभिनव देशमुख,
जिल्हा पोलिस अधीक्षक

Web Title: cartridges, seized with four pistols in Chandgad